Pimpri : शिक्षक भरतीत सात लाखांचा भाव फुटला ?; सदस्यांचा गंभीर आरोप 

शिक्षण समिती मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा केला हल्ला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षक भरतीमध्ये एका जागेसाठी तब्बल सात लाखांचा भाव फुटला आहे. महापालिकेत 131 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. एका शिक्षकाला सात लाख याप्रमाणे यामध्ये साडेतीन कोटींची उलाढाल होणार असल्यानेच सत्ताधा-यांनी सदस्य प्रस्तावाद्वारे आयत्यावेळी 51 शिक्षकांची भरती करण्याचा विषय मंजूर करुन घेतल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. तसेच शिक्षण समिती मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा हल्लाही त्यांनी चढविला. दरम्यान, विरोधकांचा विरोध नोंदवून बहुमताच्या जोरावर सत्ताधा-यांनी हा विषय मंजूर केला. 

शिक्षण समितीची पाक्षिक सभा आज (गुरुवारी) पार पडली. सभापती सोनाली गव्हाणे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. समितीच्या सभेत आयत्यावेळी 51 शिक्षक भरतीचा सदस्य प्रस्ताव सत्ताधा-यांनी मंजूर केला. त्याला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. परंतु, चार विरुद्ध पाचने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. भाजपच्या सोनाली गव्हाणे, शर्मिला बाबर, सुवर्णा बुर्डे, संगीता भोंडवे, शारदा सोनवणे यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे, राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या विनया तापकीर, उषा काळे, राजू बनसोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन समितीच्या कारभारवर हल्ला चढविला.

पती-पत्नी एकत्रीकरण, एकतर्फी सेवा वर्गीकरण अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा महापालिका शाळेत वर्गीकरण करण्याचा विषय आयत्यावेळी सभेसमोर दाखल करण्यात आला. एकूण 131 शिक्षकांची भरती करण्यात येणार असून केवळ 51 शिक्षकांच्या वर्गीकरणाचाच विषय आजच्या सभेत सदस्यप्रस्तावाद्वारे दाखल केला. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला. आयत्यावेळी विषय आणण्याचे कारण काय? केवळ 51 शिक्षकांचाच विषय का आणला? त्यासाठी एवढी घाई कशासाठी? असे प्रश्न उपस्थित केले. तथापि, सत्ताधा-यांनी विरोधकांची बाजून जाणून न घेता कामकाज रेटून नेले. बहुमताच्या जोरावर शिक्षकांचा विषय मंजूर केला.

शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे म्हणाल्या,  शिक्षक भरतीचा प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधा-यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. एवढ्या दिवस शिक्षकांची आवश्यकता नव्हती का? , शिक्षक भरतीच्या प्रस्तावाची फाईल सभापतींकडे कशी आली? असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रवादीच्या विनया तापकीर म्हणाल्या,  हा प्रस्ताव सदस्यांमार्फत मांडण्यात आला आहे.

अचानक 131 शिक्षक तेही टप्याटप्याने वर्ग करण्याचे प्रयोजन संशयास्पद आहे. तसेच शिक्षणाधिकारी रजेवर असून त्यांची घरी जाऊन स्वाक्षरी घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्य या लेखाशिर्षावरील रक्कम शाळांमध्ये ग्रीन बोर्ड बसविण्यासाठी वर्ग करण्याचा चुकीचा निर्णय देखील सत्ताधा-यांनी घेतला आहे. त्यांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काही देणे-घेणे राहिले नाही, असेही त्या म्हणाल्या. राजू बनसोडे यांनी शिक्षक भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, या विषयाचा अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात यावा. तोपर्यंत यावर स्वाक्षरी करु नये अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आयुक्तांकडे केली. संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय यावर आपण स्वाक्षरी करणार नसल्याची भूमिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतती. तथापि, सत्ताधा-यांनी सदस्यप्रस्तावाद्वारे हा विषय मंजूर करून घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.