Pimpri : भाजी मंडई परिसरात दुर्गंधी, कचर्‍याचे साम्राज्य

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील भाजी मंडई परिसरात दुर्गंधी आणि कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भाजी विक्रेत्यांकडून शिल्लक राहिलेला भाजीपाला,  खराब झालेला भाजीपाला रस्त्यांच्याकडेला फेकून दिला जातो. त्यामुळे घाणीत भर पडते.

पिंपरी-चिंचवड परिसरात अधिकृत भाजी मंडईंची संख्या कमी असल्यामुळे भाजी विक्रीची दुकाने थेट रस्त्यावरच थाटली जात आहेत. हे शहरातील बर्‍याच ठिकाणचे चित्र आहे. पिंपरीमध्ये तर हे चित्र जास्त त्रासदायक आहे. पिंपरीमध्ये प्रशस्त भाजी मंडई असतानाही किरकोळ भाजी विक्रेते रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे भाजीपाला आणि फळ विकतात. या बाजारांमुळे जागोजागी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या व्यावसायिकांमुळे  बकालपणात वाढ होत असून भाजीपाल्याच्या कचर्‍यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधीचाही सामना नागरिकांना करावा लागतो.

पिंपरीमध्ये लाल बहादूर शास्त्री ही अधिकृत भाजी मंडई असतानाही नजीकच्या ग्रामीण भागातून येणारे भाजी विक्रेते रस्त्यावरच भाजी विकायला बसतात. त्यामुळे भाटनगर, इंदिरा गांधी ब्रिजवर नेहमीच गर्दी असते. व्यावसायिकांची संख्या झपाटयाने वाढत आहे. मात्र, या भाजी विक्रेत्यांकडून सर्रास बेकायदेशीररित्या रस्त्यांवर किंवा रस्त्यांच्या कडेला भाजी विक्रीची दुकाने थाटली जात आहेत. भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी सायंकाळी असते. त्यामुळे या काळात वाहतुकीचीही समस्या मोठी असते. संध्याकाळी हे विक्रेते भाजीपाला यांचा कचरा तसाच रस्त्यावर फेकून निघून जातात. त्यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधीचाही सामना नागरिकांना करावा लागतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.