First World War: साम्राज्यवादाची महत्त्वाकांक्षा- पहिले महायुद्ध

A Story on Ambitions of Imperialism - First World War युद्धात जिंकलेले देश अभिमान मिरवू लागले. तर हारलेले देश आतल्याआत आणखी चवताळले. अतिशय रंजक वाटणारी ही युद्धाची कहाणी आहे.

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे)- 106 वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धाला आजच्या दिवशी (28 जुलै 1914) सुरुवात झाली होती. साम्राज्यवादाच्या महत्त्वाकांक्षेने संपूर्ण जगाला त्यावेळी भुरळ घातली होती. त्यानंतर सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात सर्वच देशांच्या सैन्य ताकदीचा कस लागला. युद्धात जिंकलेले देश अभिमान मिरवू लागले. तर हारलेले देश आतल्याआत आणखी चवताळले. अतिशय रंजक वाटणारी ही युद्धाची कहाणी आहे. या युद्धाची पार्श्वभूमी आणि एकंदर इतिहास यानिमित्ताने समजून घ्यायला हवा. पहिले महायुद्ध, त्याचे परिणाम आणि दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात, दुसरे महायुद्ध आणि नंतर जगाची शांततेच्या दिशेने वाटचाल असे आधुनिक जगाच्या निर्मितीचे नवीन धागे यातून सापडत जातात.

साम्राज्यवादाच्या लढाईत जगात अनेक विध्वंसक लढाया खेळल्या गेल्या. ज्यात लाखो लोकांचा नाहक बळी गेला. आशिया, यूरोप आणि आफ्रिका या तीन खंडात जमिनीवर, पाण्यात आणि हवेत खेळल्या गेलेल्या या युद्धात सुमारे एक कोटी लोकांचा बळी गेला. लाखो जखमी झाले. याच युद्धाला आपण पहिले महायुद्ध म्हणूनही ओळखतो.

दि. 28 जुलै 1914 रोजी सुरू झालेले हे युद्ध चार वर्ष तीन महिने 11 दिवसांनी 11 नोव्हेंबर 1918 रोजी संपले. या युद्धात 30 पेक्षा अधिक देशांच्या सहा कोटी 50 लाख सैनिकांनी सहभाग घेतला.

युद्धात जिंकलेल्या देशांनी हरलेल्या देशांसोबत एक तह केला. हा तह विशेषतः जर्मनी बाबत होता. यालाच व्हर्सायचा तह देखील म्हटलं जातं. या तहानुसार जर्मनीवर आर्थिक, सामाजिक, सैनिक आणि सामरिक प्रतिबंध लावण्यात आले. एक प्रकारे जर्मनीला अपंग बनवण्याचा डाव यातून युद्ध जिंकलेल्या लोकांनी साधला होता.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला साम्राज्यावादाचे वादळ सबंध युरोपात पसरले होते. ब्रिटन हा देश साम्राज्यवादासाठी युरोपात सर्वाधिक अग्रेसर होता. ब्रिटेनचे जगातील बहुतांश देशांवर अधिराज्य होते. एखाद्या देशावर अधिराज्य करण्यालाच ‘वसाहत स्थापन करणे’ असेही म्हणतात.

तर ब्रिटनच्या जगातील 25 टक्के देशांमध्ये वसाहती होत्या. ज्यात भारत एक देश होता. युरोपनंतर हा साम्राज्यवाद आशिया आणि लॅटिन अमेरिकेतही पसरला. त्यामुळे साम्राज्यवादाची भावना ही पहिल्या युद्धाचे एक कारण होते.

प्रखर राष्ट्रवाद हे दुसरे कारण आहे. प्रत्येक देशात प्रखर राष्ट्रवाद होता. राष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंधित देशातील सर्व नागरिक या युद्ध सहभागी होत असत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर अनेक देशांमध्ये गुप्त तह केले जात होते. या तहांमुळे देशादेशात अंतर्गत गट स्थापन झाले. एकमेकांवरील विश्वास कमी होऊ लागला. असुरक्षिततेची भावना वाढीस लागली.

असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याने प्रत्येक देशाने आपल्या सैन्य शक्तीचा विस्तार केला. तसेच आधुनिक शस्त्रांची निर्मिती करण्यात आली. हा देशादेशातील असंतोष ओसंडू लागला. पण हा असंतोष बाहेर येण्यासाठी काहीतरी कारण आवश्यक होते. ही ठिणगी 1914 साली जुलै महिन्यात बोस्निया येथे पडली.

जून 1914 मध्ये ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्कड्युक फ्रांझ फर्डिनांड हा त्यांच्या पत्नीसोबत बोस्निया येथे आला होता. 28 जून रोजी फर्डिनांड आणि त्याच्या पत्नीची बोस्नियातील क्रांतिकारींनी हत्या केली. ऑस्ट्रियाने या हत्येसाठी सर्बियाला दोषी ठरवले आणि एक महिन्यानंतर म्हणजेच 28 जुलै रोजी युद्धाला सुरुवात केली.

दोन गटांमध्ये हे युद्ध झाले. मित्र राष्ट्र विरुद्ध केंद्रीय सत्ता. मित्र राष्ट्रांमध्ये रुस, फ्रान्स, ब्रिटेन, अमेरिका या प्रमुख देशांचा समावेश होता. तर केंद्रीय सत्ता या गटात ऑस्ट्रिया-हंगेरी, जर्मनी, ऑटोमन साम्राज्य हे देश होते. अमेरिका या युद्धात सहभागी होण्याचे एक विशेष कारण आहे. ते पुढे येईलच.

राजपुत्राला मारल्याचा ठपका ठेऊन ऑस्ट्रियाने सर्बियाच्या विरोधात 28 जुलै 1914 रोजी युद्धाला सुरुवात केली. तर जर्मनीने 1 ऑगस्ट 1914 रोजी रशिया विरोधात युद्धाला प्रारंभ केला. 3 ऑगस्ट 1914 रोजी जर्मनीने फ्रान्स विरोधात युद्धाची घोषणा केली. 4 ऑगस्ट रोजी जर्मन सेना फ्रान्सच्या बेल्जियममध्ये घुसली.

फ्रान्स आणि ब्रिटनचे अंतर्गत संबंध असल्याने ब्रिटनचा मित्र देश असलेल्या फ्रान्सवर जर्मनीने आक्रमण केल्यामुळे 4 ऑगस्ट 1914 रोजी ब्रिटनने जर्मनीसोबत युद्ध करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात ब्रिटन 8 ऑगस्ट रोजी युद्धात सहभागी झाला. अशाच प्रकारे अन्य देश देखील युद्धात सहभागी झाले.

जपानने जर्मनीच्या विरोधात युद्ध सुरु केले. कारण जपानला जर्मनीच्या पूर्व भागात कब्जा करायचा होता. जुना सहकारी मित्र पोर्तुगाल देखील ब्रिटनच्या प्रेमाखातर युद्धात आला.

1915 मध्ये इटलीने ऑस्ट्रिया विरोधात युद्धाची घोषणा केली. कारण ऑस्ट्रिया आणि तुर्की क्षेत्राचा काही भाग इटलीला देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे ऑस्ट्रिया आणि तुर्कीचा भाग इटलीला न मिळाल्याने इटली युद्धात सहभागी झाला.

रोमानिया आणि युनान देखील ब्रिटेन, फ्रान्स, रशिया सोबत आले.

तर इकडे बुल्गेरियाला सर्बिया आणि युनानचा काही भाग देण्याचे ठरले होते. मात्र, प्रत्यक्षात याचीही अंमलबजावणी झाली नाही, म्हणून बुल्गेरिया जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या बाजूने युद्धात उतरला.

तुर्कीने जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या बाजूने रशिया विरोधात युद्धाची घोषणा केली.

…म्हणून अमेरिका युद्धात सामील

_MPC_DIR_MPU_II

अमेरिका या युद्धात तीन वर्षानंतर सहभागी झाला. त्याचे कारण असे की, 6 ऑगस्ट 1917 रोजी जर्मनीच्या यु बोटने लुसित्निया नावाच्या प्रवासी जहाजाला बुडवले. लुसित्निया जहाजात एकूण 1 हजार 153 प्रवासी होते. यातील 128 प्रवासी हे अमेरिकन होते. बोट बुडाल्यामुळे अमेरिकेचे हे प्रवासी नागरिक विनाकारण मारले गेले. त्यामुळे अमेरिका जर्मनीच्या विरोधात युद्ध करण्यासाठी उतरला.

प्रत्येक देश त्याच्या स्वतंत्र वेगवेगळ्या कारणांमुळे या युद्धात सहभागी झाला होता. पण असे काही देश होते, ज्यांचा या युद्धाशी थेट कसलीही संबंध नव्हता. परंतु, ते देश देखील युद्धात सहभागी झाले होते.

साम्राज्यवादाच्या कल्पनेतून काही बड्या देशांनी त्यांच्या वसाहती अन्य देशांमध्ये केल्या होत्या.

ब्रिटनची भारतात वसाहत होती. त्यामुळे भारत ब्रिटनसाठी युद्धात उतरला होता. सुमारे 12 लाख भारतीय सैनिक पहिल्या महायुद्धात सहभागी झाले होते. भारतीय सैनिकांची संख्या ब्रिटनच्या सैन्य संख्येपेक्षा अधिक होती.

सुरुवातीला जर्मनी युद्ध जिंकू लागला. त्यामुळे जर्मनीने विनाकारण काही देशांना डिवचण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पुन्हा जर्मनीच्या अंगलट आला. अनेक जहाजांना जर्मन सैन्याने जलसमाधी दिली.

त्यानंतर ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका यांच्या एकत्रित ताकदीपुढे जर्मनीला पळताभुई थोडी झाली. जुलै 1918 नंतर मित्र राष्ट्रांनी जर्मनीला सळो की पळो करून सोडले. यामुळे अवघ्या पाच महिन्यातच जर्मनी आणि ऑस्ट्रियाने युद्ध समाप्त करण्याची मित्र राष्ट्रांना विनंती केली.

त्यानंतर पॅरिस येथे एक शांतता परिषद झाली. या परिषदेत हरलेल्या प्रत्येक राष्ट्रासोबत स्वतंत्र तह करण्यात आला. जर्मनीसोबत व्हर्सायचा तह झाला. जर्मनीच्या व्हर्सायचा उल्लेख करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हा तहच दुस-या महायुद्धाचे प्रमुख कारण बनला होता.

पॅरिस येथे झालेल्या शांतता परिषदेसाठी जगातील 32 देशांना निमंत्रित करण्यात आले. त्यात जर्मनी, रशिया, ऑस्ट्रिया, तुर्की, बुल्गेरिया या देशांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.

या शांती संमेलनात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती वूड्रो विल्सन यांनी मांडलेला 14 कलमी सिद्धांत महत्वाचा ठरला. जगात शांती स्थापन करण्यासाठी राष्ट्र संघाच्या स्थापनेची मागणी विल्सन यांनी त्यांच्या 14 कलमी सिद्धांतात केली होती. ती मागणी काही कारणास्तव फसली. पुढे या मागणीचे रुपांतर संयुक्त राष्ट्र संघ स्थापनेच्या मागणीत झाले. त्याची कारणे पुढे येतील.

तह…तह…

पॅरिसच्या शांती संमेलनात हरलेल्या पाच देशांसोबत वेगवेगळे तह करण्यात आले. या तहांना एकत्रित पॅरिसचा शांती तह म्हणूनही संबोधले जाते.

जर्मनी सोबत व्हर्सायचा तह, ऑस्ट्रियासोबत सेंट जर्मनचा तह, बुल्गेरिया सोबत न्युइलीचा तह, हंगरी सोबत ट्रियनोचा तह आणि तुर्की सोबत सेव्रेचा तह करण्यात आला.

या तहांचा उद्देश होता की, भविष्यात होणा-या युद्धांना रोखणे, जगात शांती स्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करणे, फ्रान्सला सुरक्षा पुरवणे, जर्मनीच्या सामरिक आणि सैन्य ताकदीला लगाम घालणे आदी.

युद्धाचा परिणाम असा झाला की – रुशिया, जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, ऑटोमन साम्राज्याचा अंत झाला. अमेरिका सुपर पॉवर म्हणून पुढे आला. युरोपीय महाद्विपात एकतंत्र, राजतंत्र संपुष्टात आले. जानेवारी 1919 ते जानेवारी 1920 या काळात विजयी देशांचे पॅरिस येथे सन्मान झाले.

पराजित देशांवर लागू करण्याच्या अटी-शर्ती तयार करण्यात आल्या. यातून लीग ऑफ नेशन्सचा मार्ग मोकळा झाला. जर्मनीला 19 जून 1919 रोजी व्हर्सायच्या तहावर स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडले. यामुळे जर्मनीला आपला मोठा भूखंड गमवावा लागला.

जर्मनीने दुस-या देशांवर राज्य करायचे नाही. सैन्य दलाचा आकार कमी करायचा. 1921 पर्यंत जर्मनी आणि त्याच्या सहकारी राष्ट्रांनी मित्र राष्ट्रांना पाच अब्ज डॉलर द्यायचे ठरले.

7 मे 1919 रोजी 230 पानांचा 15 विभाग आणि 439 कलमांचा समावेश असलेला तहाचा मसुदा जर्मनीच्या प्रतिनिधींना सोपवण्यात आला. त्याच तहाने जर्मनी आणखी खवळला आणि दुस-या महायुद्धाचे महत्वाचे कारण बनला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.