Hinjawadi Crime News : पोलीस भरतीच्या परीक्षेस इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसवलेला मास्क घालून आला ‘आधुनिक मुन्नाभाई’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीची लेखी परीक्षा शुक्रवारी (दि. 19) झाली. या परीक्षेत हिंजवडी येथे एका केंद्रावर एक उमेदवार मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवून लेखी परीक्षेस आल्याचे आढळले. या मुन्नाभाईची पोलिसांकडून चौकशी होत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई पदासाठी शुक्रवारी पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या जिल्ह्यात लेखी परीक्षा झाली. सहा जिल्ह्यांतील 444 परीक्षा केंद्रांवरील सात हजार 384 हॉलमध्ये ही परीक्षा झाली या लेखी परीक्षेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी अपर पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त, 25 सहाय्यक पोलीस आयुक्त, 177 पोलीस निरीक्षक, 636 सहाय्यक पोलीस निरीक्षक / उपनिरीक्षक, 11 हजार 838 पोलीस अंमलदार असे एकूण 12 हजार 696 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, हिंजवडी येथील ब्लू रिज शाळेमध्ये अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. मुन्नाभाई एमबीबीएस या हिंदी चित्रपटात अभिनेता संजय दत्त याने मोबाईलच्या माध्यमातून कॉपी केली होती. परंतु आता मोबाईल हा प्रकार कॉपीसाठी आऊटडेटेड झाला असल्याने काही उमेदवार अनोख्या शक्कल लढवत आहेत. पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी आलेल्या एका उमेदवाराने आपल्या मास्कमध्ये चक्क इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचे आढळून आले आहे. पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास येताच संबंधित उमेदवार पळून गेला.

उमेदवाराकडे आढळलेल्या मास्कमध्ये बॅटरी, चिप, सिमकार्ड आढळले आहे. या इलेट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून हा मुन्नाभाई कॉपी करणार होता का, त्याचे आणखी काही साथीदार आहेत का, त्याला कोण आणि कशी मदत करणार होते; अशा अनेक प्रश्नांची उकल पोलीस करीत आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात नकल करण्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.