Pimpri : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे डॉक्टरांचे पथक रवाना

एमपीसी न्यूज – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निवळू लागली असून आता जलजन्य आजारांचा संसर्ग पसरण्याची भिती आहे. त्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे पूरग्रस्तांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी एक पथक पाठविले आहे. याबाबतची माहिती संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी दिली. 

पूरग्रस्तांना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी रवाना झालेले डॉक्टरांचे पथक आज (सोमवारी) कोल्हापूर व सांगलीत दाखल झाले आहे. या पथकात औषधवैद्यकशास्त्र, बालरोग तज्ज्ञ, कान, नाक व घसा तज्ज्ञ, त्वचा रोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, जन औषधवैद्यकशास्त्र (कम्युनिटी मेडिसिन) आदी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.

इरफान सय्यद म्हणाले, ”कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळू लागली आहे. पुराचे पाणी कमी झाले आहे. आता पूरग्रस्तांना जलजन्य तसेच कीटकजन्य आजारांचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. या भागात औषधांची कमतरता आहे. त्यामुळे आजारांचा वाढता धोका लक्षात घेता वैद्यकीय उपचारांची गरज भासणार आहे”.

”ताप, त्वचारोग, पाण्यातून पसरणारा लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका आहे. रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे हे पथक दिवसरात्र मेहनत घेणार आहे.  या पथकात शहरातील नामंकित रुग्णालयातील विविध शाखांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे”, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.