Hinjawadi : चाकूच्या धाकाने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक

एमपीसी न्यूज – घरामध्ये एकटी महिला असताना जबरदस्तीने घरात बसून चाकूचा धाक दाखवून लुटणार्‍या सराईत चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 2 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील चोरी, चोरीचा प्रयत्न आणि विनयभंग असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

आशिष मोहन धायगुडे (वय 31, रा. वारजे माळवाडी पुणे) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाटील नगर बावधन येथे घरामध्ये महिला एकटी असताना आरोपी आशिष याने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. महिलेचे तोंड दाबून ‘आवाज केला तर मारून टाकीन’ अशी धमकी देऊन सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस नाईक आतिक शेख यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी रामनगर बावधान परिसरात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आशिष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून 2 लाख 2 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील चोरी, चोरीचा प्रयत्न आणि विनयभंग असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी आशिष हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दत्तवाडी आणि खडक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त विनायक ढाकणे, पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, तपास पथक प्रमुख अनिरुद्ध गिझे, एम डी वरुडे, सहाय्यक पोलीस फौजदार वायबसे, पोलीस कर्मचारी बाळू शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, आतीक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, हनुमंत कुंभार, विकी कदम, ओम कांबळे, सुभाष गुरव, अमर राणे झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, अली शेख, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.