Pune News: दुचाकीचे हप्ते फेडण्यासाठी सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज: लॉकडाउन काळात काम मिळत नसल्यामुळे दुचाकीचे हप्ते थकले होते. त्यात फायनान्स कंपनीचा तगादा मागे लागल्यामुळे एका तरुणाने सोनसाखळी चोरीचा मार्ग अवलंबला. त्याने थेट महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यास सुरुवात केली. चतु:शृंगी पोलिसांनी अखेर चोरट्याला बेड्या ठोकल्या. त्याने केलेले दोन गुन्हे उघडकीस आले असून तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संजय नथू भगत (वय 34, रा. उत्तमनगर, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पाषाण परिसरातील एका महिलेचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्यांने हिसकावून नेले होते. चतु:शृंगी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना सीसीटीव्ही द्वारे एका दुचाकीचा क्रमांक मिळाला होता. पोलिसांनी आरटीओ कार्यालयातून या दुचाकीची माहिती मिळवली आणि उत्तम नगर मधून संजय भगत याचा शोध घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशी मध्ये त्याने दुचाकींचे हप्ते भरण्यासाठी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे, मोहन जाधव, प्रकाश आव्हाड, शैलेश सुर्वे, आशिष निमसे यांच्या पथकाने केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.