Talegaon News : तळेगाव एम.आय.डी.सी टप्पा क्र.4 मध्ये 32/1 च्या प्रक्रियेस मान्यता

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना अनोखी भेट 

एमपीसी न्यूज : तळेगाव एम.आय.डी.सी टप्पा क्र.4 मध्ये 32/1 च्या प्रक्रियेस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मान्यता दिली असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शेतक-यांचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या उच्च अधिकार समितीच्या (हाय पॉवर कमिटी) बैठकीत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मावळ तालुक्य्यातील तळेगाव (निगडे) एम.आय.डी.सी. टप्पा क्र.4 मधील 5500 एकर पेक्षा जास्त जमिनीच्या 32/1 च्या प्रक्रिया करण्यास मान्यता दिली असून याबाबत प्रधान सचिवांना निर्देशही दिले असल्याचे म्हटले आहे.

मावळ तालुक्यातील एम.आय.डी.सी. टप्पा क्र.4 मध्ये निगडे, आंबळे, कदमवाडी, शेटेवाडी, मंगरूळ, कल्हाट, पवळेवाडी या भागातील शेतकर्यां च्या जमिनीची यापूर्वी 32/2 प्रमाणे त्या ठिकाणी सरकारी मोजणी करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली व 32/1 च्या अंतिम मान्यतेसाठी एम.आय.डी.सी. कडे सादर करण्यात आली होती.

परंतु गेले अनेक महिने शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने निवेदने देवून या संबधी पाठपुरावा चालू होता. दरम्यानच्या काळात माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली माजी उपसभापती शांताराम कदम, भिकाजी भागवत, कृष्णा भांगरे, अड.सोमनाथ पवळे, गणेश कल्हाटकर, मारुती हांडे, रामदास चव्हाण, मोहन घोलप, शिवाजी करवंदे, बबनराव आगिवले, बबुशा भांगरे, संतोष जाचक, नथू थरकुडे, गणेश भांगरे, गोपाळ पवळे, हरिभाऊ पवळे, बुधाजी जगेश्वर, बंडू कदम, विठ्ठल कदम, तानाजी करवंदे, मंगेश शेलार, संदेश शेलार यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, प्रधान सचिव यांना 32/1 ची प्रक्रिया झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता.

परंतु आंदोलनाच्या दिवशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचेशी चर्चा करून जॉईन्ट सेक्रेटरी सुधाकर त्याचबरोबर विभागीय अधिकारी अविनाश हदगल, प्रांताधिकारी संदेश शिर्के यांचे बरोबर चर्चा झाली आणि या विषया बाबत उद्योगमंत्री यांची बैठक झाली. व त्यांनी प्रधान सचिवांना निर्देश देवून 32/1 च्या प्रक्रियेला मान्यता दिली आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे मावळच्या शेतकऱ्यांच्या वतीने बाळा भेगडे यांनी मनापासून आभार मानले.

तसेच तळेगाव एम.आय.डी.सी. येथील ऑटोमोबाईल क्षेत्रातील जनरल मोटर्स ही मल्टीनॅशनल कंपनी चीनच्या ग्रेट वॉल मोटर्स कंपनीला विकण्यात आली आहे. परंतु कंपनीत काम करणाऱ्या 3578 कामगारांवर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते यांची भेट घेवून निवेदनाद्वारे सर्व बाब लक्षात आणून दिली व जनरल मोटर्स कंपनी मधील कामगारांना ग्रेट वॉल मोटर्स कंपनीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी केली आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने याबाबतचा कामगारांच्या हिताचा ठोस निर्णय लवकरत लवकर न घेतल्यास सर्व कामगारांसोबत आंदोलन करू असा इशारा माजी.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.