Unique Leopards Friendship : 10 वर्षांची दोन दिव्यांग नर बिबट्यांची अनोखी दोस्ती

एमपीसी न्यूज : दोस्ती हा भाव सर्व प्राण्यांमध्ये आढळतो. पण, तो जर वन्य प्राण्यांमध्ये असेल, तर तो विशेष वाटतो. बिबट्या हा असा वन्य प्राणी आहे, जो नेहमी जंगलात एकटा राहतो. नर वयस्क बिबटे कधीच वनात किंवा पिंजऱ्यात एकत्र नसतात. आज मैत्री दिनानिमित्त आपण अशा दोन नर बिबटयांची कहाणी पाहणार आहोत जे गेली 10 वर्षे एकत्र एकाच पिंजऱ्यात (Unique Leopards Friendship) आनंदाने राहत आहेत. हे अनोखे दृश्य आपल्याला जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रामध्ये पाहायला मिळते.

ही अनोखी दोस्ती गणेश व विठ्ठल या दोन वयस्क नर बिबट्यांमधील आहे. वन विभाग व वाइल्डलाईफ एसओएस हे संयुक्तपणे हे केंद्र चालवतात. आज मैत्री दिवस असल्याने त्यांच्या दोस्ती बद्दलची ही अनोखी कहाणी सर्वांना प्रेरणादायी ठरेल. दिव्यांग असूनही हे दोघे बिबटे आनंदाने आपले मैत्रीचे नाते जप्त गेली 10 वर्ष एकत्र राहत आहेत.


गणेश या नर बिबट्याला 2011 मध्ये माणिकडोहच्या केंद्रामध्ये आणले होते. त्यावेळेस त्याचे वय 3 वर्ष होते. गणेश हा एका गावात गेल्यावर तेथील लोकांनी त्याच्यावर हल्ला केला व त्यात तो जखमी झाला. वन विभागाने तात्काळ तेथे पोहचून त्याला वाचवले. त्याला उपचारासाठी माणिकडोहला पाठवण्यात आले. या हल्ल्यात तो एका डोळ्याने पूर्ण आंधळा झाला. दुसऱ्या डोळ्यात मोतीबिंदू झाल्याने त्याला दुसऱ्या डोळ्याने देखील दिसत नाही.

विठ्ठल या बिबट्याला 2009 मध्ये माणिकडोहच्या केंद्रामध्ये आणले होते. त्यावेळेस त्याचे वय 4 वर्ष होते. त्याचा उजवा पंजा जंगलात एका सापळ्यात अडकल्याने जखमी झाल्याच्या अवस्थेत तो वन विभागाला मिळाला होता. त्याला माणिकडोहच्या केंद्रामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. त्याचा तो जखमी पंजा कापवा लागल्याने तो अपंग झाला.

गणेश व विठ्ठलमधील मैत्रीच्या सुरुवातीबद्दल सांगताना, प्रेस अँड मीडिया व्यवस्थापक अरिनिता सांडील्य म्हणाल्या, कि “ते स्वतंत्र जंगलात राहून शिकार करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जंगलात सोडण्यात आले नाही. सुरुवातीला गणेश व विठ्ठल यांना दोन वेगवेगळ्या शेजारच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. दोघे एकमेकांकडे बघत असत. ते एकमेकांच्या जवळून आपापल्या पिंजऱ्यातून जात असत. हे वारंवार होत असताना केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पहिले. त्यामुळे त्या दोघांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्हाला भीती होती, की ते एकमेकांवर हल्ला करतील. पण तसे काही झाले नाही. ते आनंदाने एका पिंजऱ्यात गेली 10 वर्ष एकत्र (Unique Leopards Friendship) राहत आहे.”

गणेश हा स्वभावाने शांत आहे, तर विठ्ठल हा स्वभावाने खेळकर आणि सक्रिय आहे. तरी देखील ते एकमेकांची काळजी घेताना दिसतात. गणेश हा अंध असला तरीही तो पिंजाऱ्यामध्ये सर्वत्र बिनधास्त फिरतो. कारण त्याला सर्व जागा परिचित आहेत. तो ओंडक्यावर, मचानवर चढून जातो. सांडील्य म्हणाल्या, “जंगलात किंवा पिंजऱ्यात दोन वयस्क नर बिबटे कधी आढळत नाही. गणेश व विठ्ठल मधील ही अनोखी दोस्ती आहे.”

Pallod Farms : पाळीव कुत्र्याने घेतला चावा; मालकावर गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.