23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

Pune News : किल्ले पाहिलेला माणूस! गो.नी. दांडेकर यांच्यावर आधारित चित्रफीत होणार प्रदर्शित

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज- अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातील एस.पी.कॉलेजच्या लेडी रमाबाई रानडे या सभागृहात प्रसिद्ध गिर्यारोहक गो.नी.दांडेकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत 2 एप्रिल रोजी (शनिवार) सायंकाळी 5.30 वाजता प्रदर्शित केली जाणार आहे व प्रदर्शन सोहळा पार पडणार आहे.

गो.नी. दांडेकर यांच्यावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रफितीमध्ये त्यांच्या आयुष्यातील दुर्गप्रवासातील घडामोडी आणि त्यांचे दुर्गसंवर्धनाविषयी असलेले विचार माहितीपटाद्वारे दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी दिली.

ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दुर्गभ्रमंती साठी झोकून दिले व दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली, असे दुर्गमहर्षी गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या आयुष्यावर आणि विचारावर आधारित माहितीपट पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून गिरीप्रेमी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने हा माहितीपट गिरीप्रेमींना विनामूल्य प्रवेशासहित दाखविला जाणार आहे.

तसेच ह्या कार्यक्रम प्रसंगी प्रसिद्ध लेखिका विना देव, क्युबिक्स नेटवर्कचे संचालक विजय जोशी व लेखक,दिग्दर्शक मिलिंद भणगे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने देण्यात आली.

कोण आहेत गो.नी. दांडेकर?

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर यांना गोनीदा असेही म्हणतात. गोनीदा एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखक होते. गोनीदा हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. गो.नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ ) येथे 8 जुलै 1916 रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या 12 व्या वर्षी गोनीदांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली.

त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. गो. नी. दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा 115 कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ‘गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे.

त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती करताना ‘दुर्गदर्शन’ ‘दुर्गभ्रमणगाथा’ ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचेलेखन अगदी वैशिष्ठ्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. 1 जून 1998 रोजी पुणे येथे गोनीदांचे निधन झाले.

spot_img
Latest news
Related news