Talegaon News : सावकारी जाचाला त्रासलेल्या, शासकीय अनास्थेपुढे हतबल झालेल्या शेतकरी कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा

एमपीसी न्यूज – सावकारी जाचाला त्रासलेल्या शेतकरी कुटुंबाने प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या; मात्र प्रशासनाकडून त्यावर सोयीस्करपणे दुर्लक्ष झाले. या शासकीय अनास्थेपुढे हतबल झालेल्या शेतकरी कुटुंबाने मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे आत्मदहन करण्याची परवानगी मागितली आहे.

अमृता देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांना अर्ज लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, देशमुख यांनी वारंवार विजय आणि नीता पाचपुते यांच्यावर कारवाई करण्याचे अर्ज दिले आहेत. आयुक्त कार्यालयामध्ये अनेकवेळा त्या भेटण्यास गेल्या. तरीदेखील पोलिसांनी देशमुख यांच्या कुठल्याही अर्जाची किंवा भेटीची दखल घेतली नाही. पोलिसांनी वारंवार त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस आयुक्त व पाचपुते कुटुंबाचे काही नाते आहे का, असा सवाल त्यांनी अर्जात विचारला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी गेल्याच आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाला वाचा फोडली होती.

अनेक अर्ज पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये केले आहेत. तरी देखील आयुक्त पाचपुते कुटुंबावर कुटुंब प्रमुख असल्यासारखे प्रेम करतात. म्हणून त्यांनी पाचपुते यांच्यावर अदयाप कारवाई केलेली नाही. आत्मदहनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे म्हणत देशमुख यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

Pimpri News : प्रशासकीय कार्यकाळातही लोकप्रतिनिधींचाच कित्ता; अधिकाऱ्यांचा पाहणी दौऱ्यावर भर

त्यानंतर आयुक्तानी कुटुंब प्रमुख म्हणून आमची बळजबरीने जी जागा मुळात आमची आहे ती स्वखुशीने विजय पाचपुते व निता पाचपुते यांच्या नावावर करुन दयावी, असा कुत्सीत टोला देखील निवेदनात लगावला आहे.

काय आहे सावकारी जाचाचे प्रकरण?

अमृता देशमुख यांना काही रुपयांची थोड्या कालावधीसाठी तातडीची गरज होती. विजय पाचपुते हे व्याजावर पैसे देतात म्हणून देशमुख यांनी पाचपुते यांच्याकडून पैसे घेतले. दरम्यान हे पैसे देताना पाचपुते याने अमृता देशमुख यांचे वडील चंद्रकांत चव्हाण यांची स्वकष्टार्जित काही शेतजमीन तारण मागितली. पैसे देताना सांगितले की तारण म्हणून ठेवलेल्या जमिनीचा साठे करार करून तारण द्यावी लागेल. साठेकरार करताना सिक्युरिटी म्हणून वडील चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून कुलमुखत्यारपत्र घेतले. कोऱ्या स्टॅम पेपरवर सह्या घेतल्या तसेच चंद्रकांत चव्हाण, अमृता देशमुख व तुषार देशमुख यांच्या कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या.

देशमुख यांनी पाचपुते यांची रक्कम ठरल्याप्रमाणे व्याजासह वेळेत परत केली. त्यानंतर चंद्रकांत चव्हाण यांची जमीन आणि सह्या करून घेतलेले स्टॅम्प पेपर, चेक परत मागितले. ते देण्यास पाचपुते यांनी टाळाटाळ केली. चव्हाण यांच्या जमिनीचा कुठलाही मोबदला न देता सदर जमीन विजय पाचपुते यांनी कुलमुखत्यार पत्राचा गैरफायदा घेऊन तळेगाव येथे रजिस्टर न करता परस्पर स्वतःच्या बायकोच्या म्हणजे नीता पाचपुते यांच्या नावावर केली. त्याचे लोणावळा येथील रजिस्ट्रार तर्फे खरेदीखत तयार केले.

त्यानंतर देशमुख यांनी दिलेल्या चेकवर रक्कम टाकून पाचपुते यांनी परस्पर बाउंस करून घेतले. चेक बाउंस झाल्याबाबत देशमुख यांच्यावर 138 कलम याप्रमाणे कोर्टात खटले सुरू केले. याची माहिती मिळाल्यानंतर देशमुख यांनी तलाठी कार्यालयात यासंबंधी सविस्तर अर्ज केला. त्यात ‘सदर जमिनीबाबत आम्हाला फसवण्यात आले आहे. जमिनीची कोणतीही रक्कम आम्हाला दिलेली नाही. हा सर्व गैरव्यवहार आहे’, असे तलाठी कार्यालयाच्या निदर्शनास आणून देत सदर जमिनीवर कुठलीही नोंद होऊ नये यासाठी असलेली वस्तुस्थिती मांडण्यात आली.

पाचपुते यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन त्यांच्या नावे करून घेतली. जमिनीवर आजही चंद्रकांत चव्हाण यांचा ताबा आहे. शेतकरी म्हणून तेच पीकपाणी घेत आहोत. विजय पाचपुते यांनी दमदाटीने त्या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी अनेक वेळा गुंड पाठवले. चव्हाण आणि देशमुख यांच्या विरोधात अनेक खोटेनाटे खटले कोर्टात दाखल केले. त्यातील 138 कलमाखाली केलेल्या खटल्यांमध्ये निकाल चव्हाण, देशमुख यांच्या बाजूने लागला आहे. काही खटले प्रलंबित आहेत.

विजय पाचपुते व नीता पाचपुते यांनी पुण्याच्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतपेढीतून कर्ज घेऊन देशमुख यांना पैसे दिल्याचे दाखवले आहे. याच पतपेढीत पाचपुते यांचे बेनामी खाते आहे व त्याच बरोबर त्यांचे नातलग यांचेही खाते आहे. त्या पतपेढीतून खूप मोठी कर्ज घेतल्याचे कोर्टास दाखवले आहे. या पतपेढीतून पाचपुते दांपत्याने गेल्या दहा-बारा वर्षात सतरा ते अठरा कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत. भाईचंद हिराचंद रायसोनी ही पतपेढी दिवाळ्यात असल्याने त्यावर चौकशी सुरू आहे. विजय पाचपुते व निता पाचपुते यांच्या उत्पन्नापेक्षा खूप अधिक व्यवहार ते उभयता करत आहेत. प्रशासनाने पाचपुते यांच्या घरावर छापा मारला असताना तब्बल 40 मिनिटे सौ पाचपुते यांनी दरवाजा उघडला नाही. या दरम्यान बरेच दस्तऐवज गायब केल्याची आम्हाला माहिती मिळाली, हे पोलिसांना कळवून देखील त्याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही.

पाचपुते यांनी चव्हाण व देशमुख यांच्यावर दाखल केलेल्या दोन खटल्यात पाचपुते दाम्पत्याने अवैध सावकारी म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग केली असल्याचे कोर्टाने स्पष्टपणे निकालपत्रात लिहिले आहे. त्या निकालाचा आधार घेत चव्हाण आणि देशमुख यांनी अनेक सरकारी खात्यात अर्ज केले. पाचपुते दाम्पत्य अवैध सावकारी करत असल्याने त्यांची व भाईचंद हिराचंद रायसोनी पतपेढी यांची चौकशी व्हावी अशा मागणीसाठी सर्व घटनाक्रमासह अनेक सरकारी कार्यालयात, पोलीस स्टेशन, आयकर विभाग, आर्थिक गुन्हे अन्वेषण, ईडी कार्यालयात दिल्लीपर्यंत अर्ज केले, हेलपाटे मारले. परंतु घोर निराशा पदरी आली. ‘सरकारी अधिकारी व पोलीस माझ्या खिशात आहेत, गुंड माझ्याकडे नोकरीला आहेत’, असे विजय पाचपुते वारंवार बोलत असे.

सहकार आयुक्त यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज केला असता, उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी त्याची दखल घेतली व 22 जानेवारी 2021 रोजी पाचपुते दांपत्याच्या काही मालमत्तांवर छापे टाकले. सुमारे दहा ते बारा तास कारवाई सुरू होती. यात काही कोरे चेक, स्टॅम्प पेपर व अनेक दस्तावेज मिळाले. अनेकांना सावकारी पाशात अडकवल्याचे सिद्ध झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.