Dapodi : तब्बल साडेसात महिन्यांपासून लष्करी जवानांच्या क्वार्टर्समध्ये बेकायदेशीरपणे राहायची एक महिला

A woman has been living illegally in military quarters for seven and a half months.

एमपीसी न्यूज – दापोडी येथील सीएमई परिसरामध्ये छुप्या मार्गाने प्रवेश करून जवानांच्या क्वार्टर्समध्ये एक महिला तब्बल साडेसात महिन्यांपासून राहत होती. भोसरी पोलिसांनी लष्करी जवानांच्या जीवाला धोका निर्माण करीत असल्याच्या संशयावरून त्या महिलेला अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 2) उघडकीस आला.

एलीसा मनोज पांडे खडका (वय 26, मूळ रा. लुंबिनी, नेपाळ. सध्या रा. दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक संजय आनंदराव काळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) असून लष्करातील अधिकारी व जवान या ठिकाणी वास्तव्यास आहेत.

दरम्यान, आरोपी एलीसा ही 23 मार्च 2020 पासून फुगेवाडीतील मॅकडॉनल्स येथील भिंतीवरून उडी मारून सीएमई परिसरात येऊन गपचूप राहत होती. त्यामुळे येथे राहत असलेल्या लष्करी जवानांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

एलीसा एका कॅप्टनच्या मदतीने सीएमई परिसरात येत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मात्र, तिच्या अशाप्रकारे छुप्या मार्गाने येऊन राहण्याचा नेमका हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

एलीसा सध्या पोलीस कोठडीत असून तिच्याकडे चौकशी सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.