Chikhali News : फिनेल पिऊन इमारतीवरून उडी मारलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – फिनेल पिऊन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी चिखली येथे घडली होती.

आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय महिलेच्या आईने याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आकाश सुनील पाचंगे, सासू सुनंदा सुनील पाचंगे, सासरे सुनील सिद्राम पाचंगे (सर्व रा. घरकुल, चिखली. मूळ रा. वाघोली, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने एक फेबुवारी रोजी फिनेल पिऊन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असताना माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय परिसरात तुंबळ हाणामारी झाली. त्यात सात ते आठजण किरकोळ जखमी झाले. तसेच या राड्यात दोन डॉक्टरांच्या वाहनांचे देखील नुकसान झाले होते. त्यानंतर दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

जखमी विवाहितेवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याबाबत पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.