Hinjawadi : पंक्चरचे पैसे जास्त होत असल्याचे सांगितल्याने कामगारला मारहाण; दोघांना अटक

A worker beaten by two persons in Hinjewadi.

एमपीसी न्यूज – दोन पंक्चरचे शंभर रुपये मागितल्याने दुचाकीस्वाराने आणि त्याच्या एका साथीदाराने पंक्चर काढणा-या कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता भूमकर चौक, वाकड येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

किसनकुमार शिवप्रसाद कौसल (वय 21), अक्षय शिवप्रसाद कौसल (वय 22, दोघे रा. बोडकेवाडी, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मोहंमद इकलाक अन्सारी (वय 24, रा. भूमकरवस्ती, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्सारी हे भूमकर चौकातील अमीन टायर वर्क्स या दुकानात काम करतात. आरोपी किसनकुमार याच्या दुचाकीचे मागील चाक पंक्चर झाल्याने तो दुचाकी फिर्यादी यांच्या दुकानात घेऊन आला.

फिर्यादी यांनी दुचाकीच्या चाकातील दोन पंक्चर काढल्या. त्यानंतर दोन पंक्चरचे शंभर रुपये झाल्याचे फिर्यादी यांनी आरोपीला सांगितले.

आरोपीने ‘एवढे कसे पैसे होतात? मी तुला एवढे पैसे देणार नाही’ असे म्हटले. त्यावर फिर्यादी यांनी ‘पैसे दिल्याशिवाय मी गाडी सोडणार नाही’ अशी भूमिका घेतली. त्यावरून आरोपीने त्याच्या भावाला फोन करून बोलावून घेतले.

त्यावेळी फिर्यादी त्यांच्या दुकानात काम करत होते. फिर्यादी यांना काही कळण्याच्या अगोदरच आरोपींनी लोखंडी रॉडने मारून फिर्यादी यांना जखमी केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.