Housing Society : मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांच्या फेडरेशन्ससोबत पुढच्या रविवारी अडचणी जाणून घेण्यासाठी घेणार कार्यशाळा

एमपीसी न्यूज : मोठ्या हाऊसिंग सोसायटींकडून (Housing Society) ओला कचरा घेणे बंद करण्याचा निर्णयावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ठाम आहे. पण, शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांच्या फेडरेशन्ससोबत पुढच्या रविवारी त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कार्यशाळा घेणार आहे. अशी माहिती अजय चारठणकर उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचा ओला कचरा 2 ऑक्टोबरपासून न उचलण्याचा निर्णय घेऊन, ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था प्रतिदिन 100 किलो कचरा निर्माण करतात, त्यांना नोटिसा दिलेल्या होत्या. या नोटिसा आल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील सोसायट्यांना विश्वासात न घेता घेतलेल्या निर्णयामुळे चिखली-मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंग यांना पत्रव्यवहार करून पिं.चि. मनपाने जर ओला कचरा उचलणे बंद केले, तर हा सर्व ओला कचरा पिंपरी चिंचवड मनपाच्या गेटवर आणून टाकण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. सोसायटी फेडरेशनच्या या आक्रमक भूमिकेनंतर पिंपरी चिंचवड मनपाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी बुधवारी 28 सप्टेंबर रोजी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

चारठणकर म्हणाले, की फेडरेशनची मागणी (Housing Society) होती की ओला कचरा प्रक्रिया करण्यासाठीची यंत्रणा उभारण्यासाठी किंवा योजना करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी द्यावा. 2016 नंतरच्या मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांसाठी ओला कचरा स्वतः प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या टप्प्यात याची अंमलबजावणी करावी. 2016 च्या अगोदरच्या मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांनी दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी करावी. तसेच, दैनंदिन 100 किलो पेक्षा कमी कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांवर तिसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी करावी. या मागणी संदर्भात मनपा विचार करेल.

मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना ओला कचरा प्रक्रिया करण्यासंदर्भात विविध अडचणी आहेत. त्याविषयी बोलताना चारठणकर म्हणाले, की ज्या सोसायट्यांकडे ओला कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी जागा नाही किंवा दुर्गंधी व इतर कारणांमुळे ही केंद्र उभारू शकत नाहीत, अशा सोसायटींनी त्यांचा ओला कचरा प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदारांना द्यावा व अशा ठेकेदारांना त्यांनी यासाठी पैसे द्यावेत. वाकड भागातील पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशन यांना सुद्धा ओला कचरा प्रक्रिया करण्यासंदर्भात काही अडचणी आहेत व त्यांनी या संदर्भात कोणत्याही चर्चा करण्यासाठी रविवारी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शहरातील सर्व हाऊसिंग सोसायटी फेडरेशन्स व व मोठ्या हाऊसिंग सोसायटींच्या प्रतिनिधींसोबत पुढच्या शनिवारी किंवा रविवारी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येईल.

संजीवन सांगळे (अध्यक्ष -चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन) म्हणाले, की जोपर्यंत 2016 नंतरच्या मोठ्या गृहप्रकल्पामध्ये ज्या विकसकानी नियम धाब्यावर बसवून ओला कचरा सोसायट्यांमध्ये जिरवण्याचे प्रकल्प उभारून दिलेले नाहीत, त्यांच्यावर त्यांनी नियमभंग केला म्हणून कारवाई होत नाही, तसेच पिं.चिं. मनपाच्या बांधकाम विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी अशा गृहप्रकल्पाना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. व सोसायट्यांच्या सर्व अडचणी दूर होत नाहीत, तोपर्यंत सोसायट्यातील कचरा उचलणे बंद करू नये. अन्यथा पिं.चिं.मनपास सोसायटी धारकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.

यावर चारठणकर म्हणाले, की 2016 नंतरच्या मोठ्या (Housing Society) गृहप्रकल्पात विकसकांनी ओला कचरा हा गृहप्रकल्पात जिरवण्याचे प्रकल्प करून देणे अनिवर्य असताना ते करून न दिल्याने बिल्डरवर नियमभंग केला म्हणून कारवाई करणे, तसेच पिं.चिं.मनपाच्या ज्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा गृहप्रकल्पास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले यांच्यावर कारवाई करण्याची फेडरेशनने जी मागणी केली आहे. हे माझ्या अधिकार कक्षेत येत नाही. या सर्व गोष्टी माननीय आयुक्त साहेबांच्या अधिकारात येतात. फेडरेशनने यासाठी माननीय आयुक्त साहेबांच्याकडे पाठपूरावा करावा. माझे काम हे अभियान सोसायटीधारकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सहकार्य करून हे अभियान यशस्वीपणे राबवणे हे आहे.

Pimpri News : ‘प्रश्नमंजुषा’ चर्चासत्राच्या माध्यमातून माहिती अधिकार दिन साजरा

संजय गोरड (संघटक -चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन) म्हणाले, की पिंपरी चिंचवड शहरातील सर्व लोकप्रतिनिधी माननीय 3 आमदार व दोन खासदार व सोसायटी फेडरेशन प्रतिनिधी यांची संयुक्त मिटिंग होऊन यावर योग्य तोडगा निघत नाही, तोपर्यंत सोसायट्यांच्या कचरा उचलणे बंद करू नये ही विनंती. अन्यथा हा सर्व ओला कचरा पिं.चिं. मनपाच्या गेटवर आणून टाकला जाईल.

यावर चारठणकर म्हणाले, की यासंदर्भात आयुक्त निर्णय घेतील.

नितीन काळजे (माजी महापौर, पिं. चिं. मनपा) म्हणाले, की शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक शेवटी यांच्या या सर्व ओल्या कचऱ्याबाबतच्या समस्या घेऊन आमच्याकडे येतील व पिं. चि. मनपा प्रशासन, सोसायटीधारक व लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष होऊन शहराचे वातवरण खराब होईल. त्यामुळे यावर सामंजस्याने तोडगा निघेपर्यंत सोसायट्यांचा ओला कचरा उचलणे बंद करू नये.

कालच्या बैठकीस चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, सचिव प्रकाश जुकंटवार, संघटक संजय गोरड, माजी महापौर नितीन आप्पा काळजे, फेडरेशन पदाधिकारी, सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी, सभासद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.