Pune Crime News : खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : पोह्याची गाडी लावण्यासाठी दरमहा सहा हजार रुपये खंडणी द्यावी लागेल या मागणीसाठी चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाचे अपहरण केले. त्याला चारचाकीत कोंबून जबरदस्तीने हडपसर परिसरातील निर्जनस्थळी घेऊन जात बेदम मारहाण केली. संबंधित तरुणीने दिलेल्या तक्रारी नंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हर्षल गुंजाळ, शेखर लोंढे, अभिजित दत्ता पाखरे आणि श्रीशैल्य सोमनाथ मस्के अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. निलेश तुळशीराम अहिरवार या तरुणाने या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश अहिरवार हा धानोरी परिसरात राहण्यासाठी आहे. तो पोहे विक्रीचे काम करतो. 4 डिसेंबर रोजी फिर्यादी हा भावासह घरी असताना आरोपी त्याच्या घरात घुसले आणि जर तुला पोह्याची गाडी लावायची असेल तर आम्हाला दर महिना सहा हजार रुपये खंडणी द्यावी लागेल अशी मागणी केली. याला फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने त्याला जबरदस्तीने उचलून चार चाकी गाडीत टाकले आणि हडपसर परिसरातील निर्जन स्थळी घेऊन जात त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आम्हाला दर महा पैसे दिले तरच तुला सोडू, तू पैसे नाही दिले तर तुला पुन्हा घरात घुसून मारू अशी धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठलं झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.