Pune Crime News : मध्यरात्रीच्या सुमारास कोंढव्यात तरुणावर गोळीबार

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील कोंढवा परिसरातील खडीमशीन चौकात राहणाऱ्या एका तरुणावर शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिग्नेश गोरे (वय 19, रा. खडी मशीन, कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे. जिग्नेश घराबाहेर उभा असताना दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने त्याच्यावर गोळी झाडली. कोंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पणे गोळीबार झाल्याने या परिसरात चांगलीच खळबळ माजली होती. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जिग्नेश घराजवळ थांबला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी जिग्नेशच्या दिशेने गोळी झाडली. मांडीला चाटून गेल्याने तो जखमी झाला आहे.  जिग्नेशच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांनाही याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी गोळीबार केला का त्याची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जिग्नेशच्या मित्राचे ताब्यात घेतलेल्या आरोपी सोबत भांडण झाले होते. त्या वादातून हा प्रकार झाला का याचाही तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.