Pune News : हुल्लडबाजी जीवावर बेतली, मित्रांसोबत पोहण्यासाठी आलेल्या तरुणाचा खडकवासला धरणात मृत्यू

एमपीसी न्यूज : रविवारची सुट्टी असल्यामुळे मित्रांसोबत खडकवासला धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  दुपारच्या सुमारास ही घटना घडली. योगेश नवनाथ नवले असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर हवेली पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी खडकवासला धरणात शोध घेऊन या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

 याप्रकरणी अधिक माहिती अशी की मयत योगेश नवले हा मूळचा अहमदनगरचा आहे. मागील काही वर्षापासून तो पुण्यात राहत असून रविवार पेठेतील एका दुकानात काम करत होता. रविवारची सुट्टी असल्यानमुळे तो चार मित्रांसोबत खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेला होतो. योगेश आणि त्याच्या चारही मित्रांची पाण्यात उतरून हुल्लडबाजी सुरू होती. पोहून झाल्यानंतर ते सगळे बाहेर आले, मात्र योगेश अंगाची माती धुण्यासाठी पुन्हा पाण्यात उतरला. आणि काही वेळाने तो मित्रांना दिसेनासे झाला.

पण बराच वेळ झाल्यानंतरही पाण्यात उतरलेला योगेश दिसत नव्हता त्यामुळे मित्रांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा हा गोंधळ पाहून जवळच असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याबाबत कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी पाण्यात शोध घेऊन योगेशचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह आता शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून हवेली पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.