Pune News : आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या तरुणीचा दुकान मालकाकडून विनयभंग

तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : घराशेजारी असणाऱ्या सुपर मार्केटमध्ये आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा 61 वर्षीय दुकान मालकाने विनयभंग केला. या प्रकारानंतर संबंधित तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर दुकान मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतम रामदास वैष्णव (वय 61) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. एका 37 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 28 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेची 19 वर्षीय मुलगी आरोपीच्या सुपर मार्केटमध्ये आईस्क्रीम विकत घेण्यासाठी गेली होती. यावेळी दुकान मालक असलेल्या गौतम वैष्णव याने आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने तिला जवळ ओढून तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. या सर्व प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.