Pune News : सिंहगड रस्ता परिसरात पायलिंग मशीनच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

सुपरवायझरसह चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव खुर्द भागात एका बांधकाम साइटवर पायलिंग मशीनचे काम सुरू असताना चालकाच्या आणि अन्य एका व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे पायलिंग मशीनचा धक्का लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 28 जानेवारी रोजी हा अपघात घडला. सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अक्षय मनेक टेकाम (वय 20, रा. धर्मावत नगर लेबर कॅम्प मध्य प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद पाइल्स प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चे सुपरवायझर विशाल दिनेश चोबे (वय 26, सध्या रा. धायरी, मूळ उत्तरप्रदेश) आणि पायलींग मशीनचा चालक अजय विजय बहादुर यशपाल (वय 24, रा. वडगाव बुद्रुक, मूळ उत्तरप्रदेश) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार विशाल गवळी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की वडगाव खुर्द परिसरात सुंदर संस्कृती फेज 4 या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी पायलिंग मशीनचे काम सुरू असताना सुपरवायझर विशाल दुबे आणि मशीनचा चालक अजय विजय बहादुर यांच्या हलगर्जीपणामुळे पायलिंग मशीनचा धक्का लागल्याने अक्षय टेकाम या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु तपासाअंती वरील आरोपींचा निष्काळजीपणा अक्षयच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे उघडकीस आले होते. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.