Wakad : आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांची अटक व सुटका

थकीत बिलासाठी नातेवाईकांना रुग्णाला भेटण्यास मज्जाव केल्याचे प्रकरण

एमपीसी न्यूज – रुग्णाला रुग्णालयात डांबून ठेवले, तसेच नातेवाईकांना रुग्णाला भेटण्यापासून मज्जाव केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपींना अटक केली. तसेच त्यांची जामिनावर तात्काळ सुटका देखील करण्यात आली. थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे आणि राजेश दुबे अशी अटक आणि सुटका करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संजय दशरथ आरडे (वय 38, रा. कैलासनगर, पिंपरी कॅम्प, पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादी संजय यांचे वडील दशरथ आरडे यांना मज्जासंस्थेच्या आजारावरील उपचारासाठी 8 ऑगस्ट रोजी थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर डीस्चार्ज दिला. दशरथ यांचा मुलगा संजय यांनी बिलामध्ये सूट मिळण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील कागदपत्रे सादर केली, तरीदेखील रुग्णालय प्रशासनाने बिलाची संपूर्ण रकमेची मागणी केली. तसेच संपूर्ण पैसे भरल्याशिवाय रुग्णाला सोडणार नसल्याचे सांगण्यात आले. रुग्णाला रुग्णालयात डांबून ठेवले, नातेवाईकांना रुग्णाला भेटण्यापासून मज्जाव केला. याप्रकरणी आदित्य बिर्ला रुग्णालयातील अधिकारी आणि सुरक्षा राक्षकांवर भारतीय दंड विधान कलम 344, 323 आणि 34 अन्वये बुधवारी (दि. 22) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार वाकड पोलिसांनी आज (शुक्रवारी) सकाळी रेखा दुबे आणि राजेश दुबे यांना अटक केली. दाखल करण्यात आलेला गुन्हा जामीनपात्र असल्याने दोघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर, काही जण बेकायदेशीरपणे रुग्णालयात येऊन दशरथ आरडे यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना रुग्णालयातून जबरदस्तीने घेऊन गेले. तसेच कोणत्याही कायदेशीर परवानगी शिवाय रुग्णाची महत्वाची कागदपत्रे देखील नेली. यासाठी पोलिसांनी रुग्णाच्या नातेवाईकांना मदत केल्याचा तक्रार अर्ज आदित्य बिर्ला रुग्णालयाकडून वाकड पोलिसांना देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.