Pimpri News: पथनाट्य, गीत गायनातून महापालिकेच्या विविध योजनांची जनजागृती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील नागरिकांसाठी राबविल्या जाणा-या विविध योजनांची पथनाट्य, गीत गायनातून जनजागृती करण्यात आली. आरोग्याचे महत्व पटवून देणा-या झुम्बा, योगासने, ग्रूप डान्स, अॅरोबिक्स प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

‘क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सेक्टर 9 मोशी येथील महापालिकेच्या बास्केट बॉल कोर्ट मैदानावर ‘आझादी का अमृत महोत्सवाच्या’ दुस-या दिवसातील पहिल्या सत्राची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. पालिकेच्या वतीने शहरातील विविध घटकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. यामध्ये, मुलींना प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य, महिलांसाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, उद्योजकता विकास मार्गदर्शन, बचत गटास अर्थसहाय्य, गरोदर मातांना भत्ता, उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य, अंध, अस्थिव्यंग, मुकबधीर मतिमंद विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विधवा / घटस्फोटित महिलांना उद्योग- व्यवसायासाठी अर्थसहाय्य, मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थीनींना स्वयंरोजगाराकरीता संगणक प्रशिक्षण, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप अशा अनेक योजनांची माहिती पथनाटय सादरीकरणातून देण्यात आली.

तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे, क प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व जनसंपर्क ‍विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा क क्षेत्रिय अधिकारी आण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबा ढवळे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षक अशोक पटेकर, पतंजली योग समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. वजन वाढविण्यापेक्षा कमी करण्यावर जास्तीची कसरत करावी लागत आहे. विविध आजारांनी घेरलेल्या मानवी शरीराला आजारांपासून वाचविण्यासाठी व निरोगी शरीराकरीता व्यायामाची गरज आहे. भारताने जगाला योगा दिला. परंतू, आपणच योगापासून दूर राहिलो आहे, असे सांगत पतंजली योग समितीच्या साधकांनी योगाचे विविध प्रात्यक्षिके सादर करून त्याचे महत्त्व पटवून दिले.

दरम्यान, पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे पहिल्या दिवशी दुपारी महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, अग्निशामक दलातर्फे प्रात्यक्षिक, अॅरोबिक्स प्रात्यक्षिक, पथनाट्य, संगीत कार्यक्रम, वॉल पेंटिंग, रोपांचे वितरण त्याचबरोबर लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, बेडूक उड्या, सॅक रेस, गाढवाला शेपटी लावणे, खुले व्यासपीठ – मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. महापालिकेच्या वतीने 1 ते 3 ऑक्टोबर या कालावधीत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून या महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.