Akurdi : पिंपरी चिंचवड शहरातील 39 महा ई सेवा केंद्र आजपासून पुन्हा सुरु

39 Maha e-service centers in Pimpri Chinchwad city reopened from today

एमपीसीन्यूज : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार अप्पर तहसील पिंपरी चिंचवड कार्याल्याअंर्तगत असलेल्या सर्व नागरी सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्र अटी व शर्तीनुसार आजपासून ( शुक्रवार) पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये कंटेनमेंट झोनमधील नागरी सुविधा क्रेंद्र व महा ई सेवा केंद्रांना वगळण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांनी गुरुवारी ( दि.18) पिंपरी चिंचवडमधील 39 महा ई सेवा केंद्र व एक नागरी सुविधा केंद्र चालक यांची आकुर्डी येथील तहसील कार्यालयात बैठक घेतली.

यावेळी तहसीलदार गायकवाड आणि नायब तहसीलदार अंकुश आटोळे यांच्या हस्ते या केंद्र चालकांना थ्री लेअर मास्कचे वाटप करण्यात आले.

तहसीलदार गायकवाड म्हणाल्या, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार अप्पर तहसील पिंपरी चिंचवड कार्याल्याअंर्तगत असलेल्या सर्व नागरी सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी शासनाने काही अटी व शर्ती बंधनकारक केल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन, थर्मल स्कॅनिंग, मास्क वापरणे, महा ई सेवा व सेतु केंद्राचे नियमित सॅनिटाझेशन करणे, वारंवार हात धुणे, केंद्रात गर्दी होऊ न देणे, केंद्राच्या दर्शनी भागावर केंद्र चालकाचा मोबाईल नंबर लिहिणे आदी अटी आणि शर्तींचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले.

तसेच या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पालक व विद्यार्थी यांनी आवश्यक दाखले काढण्यासाठी केंद्रामध्ये गर्दी करू नये.

प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे आणि तोंडाला मास्क लावावे, असेही तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.