Akurdi : लॉकडाउनमध्ये शुभश्रीत रंगली अनोखी फोटोग्राफी स्पर्धा; रहिवाशांच्या टॅलेंटला मिळाला वाव

शुभश्रीमधील शहा दाम्पत्याचा आगळावेगळा उपक्रम

एमपीसी न्यूज : करोना विषाणूने जगभरात घातलेल्या धुमाकुळामुळे सर्वजण घरातच अडकून पडले आहोत. या लॉकडाउनच्या कालावधीत घरात बसून कंटाळलेल्या नागरिकांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, या हेतूने आकुर्डी येथील शुभश्री गृहसंकुलात फोटोग्राफीची अनोखी स्पर्धा रंगली. यामध्ये स्थानिक आबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सोसायटीचे खजिनदार सुनील शहा आणि त्यांच्या पत्नी साधना शहा यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा पार पडली. सध्याच्या गतिमान युगात एका ठिकाणी राहण्याची कोणालाच सवय राहिलेली नाही. आई बाबा कामाला, मुले शाळेत, आजी आजोबा असले तर तेच फक्त घरी अशी आपली सध्याची लाइफस्टाईल आहे. मात्र, सध्या सगळेच घरात लॉकडाऊन आहेत. घरात राहण्याचे तीन आठवडे होऊन गेले आहेत.

तरीदेखील लॉकडाऊन संपणार नसून आणखी दोन आठवडे आपल्याला घरातच काढायचे आहेत. अशा वेळी लहानथोरांना सगळ्यांनाच घरातच रमवण्यासाठी एक आगळी वेगळी स्पर्धा आकुर्डी येथील शुभश्री रेसिडेन्शियल या सोसायटीत आयोजित करण्यात आली. सोसायटीत तीन इमारतींपैकी c -1 मध्ये ही स्पर्धा रंगली.

स्पर्धकांनी घरातच राहून घरातल्याच, एरवी साध्यासुध्या, बिनकामाच्या वाटणा-या वस्तूंपासून काहीतरी वेगळा संदेश देणारे फोटो काढण्याची ही स्पर्धा होती. स्पर्थकांनी आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत मोबाईलवरच फोटो काढून त्याला छानशी फोटो ओळ द्यायची आणि आपल्यातील सृजनाला फुलवायचे, अशा प्रकारची ही स्पर्धा होती.

स्पर्धा जाहीर केल्यानंतर स्पर्धकांना फोटो काढण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला होता. या कालावधीत सोसायटीतील लहान मोठ्या सा-यांनीच आपल्या कल्पनाशक्तीला चौफेर वाव दिला. त्यानंतर मिळालेला रिझल्ट तर खूपच अप्रतिम होता. कोणी सावल्यांचा खेळ रंगवला, तर कोणी सध्या खणातच असलेल्या पुस्तकांचे महत्व कॅमे-यात टिपले.

काहींनी छंदांच्या आधारे मार्गक्रमण चालू असल्याचे फोटोमधून दाखवून दिले. तर कोणी परमेश्वराचा हवाला देऊन त्याच्यावर सध्या सगळी भिस्त असल्याचे दर्शवले. एकंदरीने कंटाळलेल्या रहिवाशांनी आपल्यामधील टॅलेन्टला दाखवून देत ही स्पर्धा मनोरंजक बनवली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.