Alandi : माऊलींच्या पालखीचे हरिनाम गजरात प्रस्थान; कोरोनामुळे मोजक्या वारकऱ्यांची उपस्थिती

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi prasthan sohala; Few warkaris attend due to coronavirus pandemic.

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाकडून लागू केलेल्या निर्बंधाचे व नियमांचे काटेकरपणे पालन करीत मोजक्याच वारकरी भाविकांच्या उपस्थितीत हरिनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आज, शनिवारी (दि.१३) दुपारी साडेचारच्या सुमारास विठुरायाच्या भेटीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले.  यावेळी ‘माउली माऊली’च्या जयघोषाने मंदिर परिसरासह अलंकापुरी दुमदुमून गेली होती. प्रस्थानापूर्वी अमोल गांधी, महेश जोशी, राजाभाऊ थेटे, योगेश चौधरी यांनी श्रींच्या पूजेचे पौरोहित्य केले.

या प्रसंगी पुणे जिल्हा सत्र न्यायाधिश एन.पी. धोटे,खासदार डॉ. अमोल कोल्हे, उर्जितसिंह शितोळै सरकार, प्रमुख विश्वस्त अँड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक,आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगराध्यक्ष बबनराव कु-हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, खेडचे प्रांत संजय तेली, तहसिलदार सुचित्रा आमले, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे ,बाळासाहेब रणदिवे, मानकरी बाळासाहेब कु-हाडे, योगेश आरु, अनिल कु-हाडे, मंडलाधिकारी चेतन चासकर, तलाठी विकास नरवडे, फडकरी, दिंंडीकरी, मानकरी आदी उपस्थित होते.

प्रस्थान सोहळ्याचे नियोजन यावर्षी थेट शासन हस्तक्षेपात मोजक्या मानकरी, सेवेकरी, दिंडीकरी आणि वारकरी भाविकांच्या उपस्थितीत झाले. यावर्षी सोहळ्यावर कोरोनाचे संकट असल्याने पुरेशी दक्षता व काळजी घेत महसूल व पोलीस प्रशासनाने चांगले नियोजन केले होते.

या उपाययोजनेस आळंदीकर नागरिक व भाविकांनी ही मोठा प्रतिसाद दिल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविता आले. यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.

प्रस्थान सोहळ्यापूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रींना महानैवेद्य दाखवण्यात आला.

यासाठी प्रथम सेवेकरी व स्वच्छता स्वयंसेवक यांनी श्रींचा गाभारा स्वच्छ केला. मंदिरात भाविकांना दर्शनास बंदी असल्याने यावर्षी श्रींच्या संजीवन समाधी दर्शनापासून भाविक वंचित राहिले.

यावर्षी माउलींचा पायी वारी सोहळा रद्द झाल्याने सोहळ्यातील इतर कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. सोहळ्यास यावर्षी थेट सुरुवात करण्यात आली.

दुपारी अडीच ते साडेतीनच्या सुमारास श्रींच्या रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात सोहळ्यातील परंपरे प्रमाणे चोपदार यांच्या सूचनांप्रमाणे महाद्वारातून प्रवेश देण्यात येतो.

मात्र, यावर्षी दिंड्याऐवजी संबंधित घटकांचा स्थानिक प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात आला.

दरम्यान, श्रींच्या मंदिरात माउलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने श्रींना वैभवी पोशाख परिधान केल्यानंतर श्री गुरू हैबतरावबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची परंपरेने हरिनाम गजरातआरती झाली. त्यानंतर माउली संस्थांनतर्फे श्रींची आरती करण्यात आली.

श्रींच्या वैभवी चांदीचा पादुका प्रस्थानासाठी वीणा मंडपात पुष्पसजावटीने सजलेल्या चौथऱ्यावर ठेवण्यात आल्या. त्यानंतर श्रींच्या चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली.

या वेळी सोहळ्यातील नियमाप्रमाणे आळंदी संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना पागोटे वाटप, श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने दिंडीप्रमुखांना पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर,बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते नारळ प्रसाद वाटप झाले.

श्रींच्या संजीवन समाधी गाभाऱ्यात आळंदी देवस्थानच्या वतीने परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला धार्मिक उपक्रम होताच श्रींच्या चलपादुका देवस्थानतर्फे पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या.

मालक आरफळकर यांनी श्रींच्या पादुका हातावर घेत हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिण करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास माउलींच्या पालखी सोहळ्याने पंढरीकडे प्रस्थान ठेवले.

मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर श्रींच्या पादुका आजोळघरा लगतच्या जुन्या रामवाड्याच्या जागेतील दर्शनबारी सभागृहात हरिनाम गजरात आणण्यात आल्या. येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा सोहळा विसावला.

आळंदीत यावर्षी पहिल्यांदाच कोरोना संकटामुळे माउलींचा सोहळा सतरा दिवस आळंदीतच राहणार आहे. मंगळवारी (दि.३०) श्रींचे चलपादुका पालखी वाहनातून अथवा हेलिकॉप्टरमधून पंढरपूरला आषाढी एकादशी सोहळ्यास मार्गस्थ होणार आहे.

यावर्षीची पायी वारी रद्द झाल्याने अनेक वारकरी वारीला जाण्याची इच्छा असूनही सुरक्षिततेच्या कारणास्तव न जाता घरी राहून वारीत श्रींचे दर्शन थेट प्रक्षेपणातून घेणार आहेत. यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

यावर्षी श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा न होता थेट सोहळा मालकांच्या हातात पादुका देऊन प्रदक्षिणा झाली. प्रस्थान निमित्त मंदिरात पुष्प सजावट व आकर्षक रंगावली काढण्यात आली होती. नागरिकांनी घरात राहून पालखी प्रस्थान सोहळ्याच्या आनंद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.