Pune: आम आदमी पार्टीचे मनपा आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

Aam Aadmi Party's sit-in agitation outside the Pune Municipal Corporation .

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर सोमवारी ठिय्या आंदोलन केले.

शहरामध्ये सध्या कोविड, संशयित आणि बिगर कोविड रुग्णांना उपचार मिळण्यामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. या आठवड्यात व्हेंटिलेटर नसल्याने डॉ. लक्ष्मी नरसिंहन या शास्त्रज्ञासह पुण्यातील अनेक नागरिकांचा जीव हकनाक गेला आहे.

बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा पुणे शहरात तयार झालेला तुटवडा, ब्लॅक मार्केटिंग रोखण्याबाबत आणि येत्या काळात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांची संख्या वाढवण्याबाबत आम आदमी पार्टीने दिनांक १३ जुलै आणि १५ जुलै रोजी इमेलद्वारे प्रशासनाला निवेदन दिले होते.

पण, परिस्थितीत फारशी सुधारणा नसल्याने याचे गांभीर्य प्रशासनाला जाणवून देण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले.

यावेळी आयुक्तांशी चर्चा करताना आम आदमी पक्षाने डॅशबोर्डवर पुणे शहरातील केवळ 42 रुग्णालये (कोविड केअर सेंटर वगळता) आहेत आणि पुण्यात खाजगी रुग्णालयांची संख्या खूप मोठी आहे, हे मांडले.

जास्तीत जास्त बेड अधिग्रहित करून ते वापरात आणण्याची मागणी यावेळी आप संघटन मंत्री डॉ. अभिजित मोरे यांनी केली.

शहरामध्ये कोणत्या रुग्णालयांमध्ये किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती देणारा डॅशबोर्ड प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिलेला आहे. पण, या डॅशबोर्डवरील माहिती ही रिअल टाईम अपडेट होत नाही. त्यामुळे डॅशबोर्डवर रिकामे बेड दिसत असून देखील प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये फोन केल्यावर ते बेड भरल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे रुग्णांना बेड मिळण्यास प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आज दिनांक २० जुलै २०२० रोजी बेड नाकारल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करणारे कॉल रेकॉर्डिंग आयुक्तांपुढे डॉ.  अभिजित मोरे यांनी सादर केले. काही रुग्णांचे अनुभव मांडले आणि कारवाईची मागणी केली.

डॅशबोर्डवर हॉस्पिटलचा पत्ता, फोन नंबर, लोकेशन अपडेट करण्याची तसेच रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची मागणी आप पुणे संयोजक मुकुंद किर्दत यांनी केली. ही सर्व माहिती पुणे मनपाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्याबाबतचा आग्रह किर्दत यांनी धरला.

कोविड केअर सेंटरमधील सुविधा, स्वच्छता, सेवा व वागणूक यामध्ये  सुधारणा करण्यात यावी. कोविड टेस्टचा लिखित अथवा इलेक्ट्रॉनिक रिपोर्ट टेस्ट झालेल्या व्यक्तीला दिला जावा, अशी मागणी आप कोथरुड सहसंयोजक प्रा. सुहास पवार यांनी केली.

दरम्यान, मनपा आयुक्तांनी या सूचनांचे स्वागत केले. प्रशासनाने या मुद्द्यावर सुरू केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

बेडचा तुटवडा नाहीसा करण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सोशल डिस्टन्सिंग पाळत केलेल्या या आंदोलनामध्ये आनंद अंकुश, सुहास पवार, मनोज थोरात, अशोक तळेकर, संदीप पासलकर, विजय तळेकर, विनायक भुरुक, सतीश यादव, जीवन रामतीर्थे, शैलेश आवळे, आनंद अंकुश, नजीर शेख, अविनाश पवार, विनोद शिवणकर,  केदार ढमाले, आकाश रोकडे, सुनील कांबळे, प्रीतम खंडागळे, विनोद शेलार, गणेश ढमाले, संदीप सोनवणे, डॉ. अभिजित मोरे, मुकुंद किर्दत यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.