Pimpri : टक्केवारीचे राजकारण संपविण्यासाठी ‘आम आदमी’ महापालिका निवडणूक लढविणार

दिल्लीतील दंगलीमागे अप्रत्यक्षपणे भाजपचा हात; आम आदमी पार्टीची घोषणा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे राजकारणमागील 50 वर्षापासून गावकी-भावकीतच होत आहे. ठराविक घराण्यांच्याच हातात शहराचा कारभार आहे. प्रस्थापित पक्षांची भ्रष्ट व्यवस्था सर्वसामान्य जनतेला नकोशी झाली आहे. सर्वपक्षीय मिळून महापालिकेत टक्केवारीचे राजकारण करत असल्याचा आरोप करत टक्केवारीचे राजकारण संपविण्यासाठी महापालिकेची फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी आगामी निवडणूक लढविण्याची घोषणा आम आदमी पार्टीने आज (बुधवारी) केली. तसेच महापालिकेने पाण्याची श्वेतपत्रिका काढावी. गळती रोखावी त्यानंतरच कपात लागू करावी. दिल्लीतील दंगलीमागे अप्रत्यक्षपणे भाजपचा हात असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

आम आदमी पार्टीची आज (बुधवारी) चिंचवडमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी पुण्याचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, संघटनमंत्री डॉ. अभिजीत मोरे, पिंपरीचे  नवनिर्वाचित शहराध्यक्ष अनुप शर्मा, सचिव राघवेंद्र राव उपस्थित होते.  मुकुंद किर्दत म्हणाले, दिल्ली निवडणुकीमुळे देशातील राजकारणाचा पोत बदलत आहे.  कामाला लोक मत देत आहेत. आम आदमीने कामावर मते मागत दिल्ली जिंकली. बलाढ्य अशा भाजपला दिल्लीतील सर्वसामान्य जनतेने पराभवाची धूळ चारली. भाजपने ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. परंतु, दिल्लीतील सुज्ञ जनता फसली नाही. काम करणा-यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळे सामान्य माणसाला आम आदमी पार्टीबद्दल उत्सुकता आहे.

पक्षाला महाराष्ट्रात मोठा पाठिंबा मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत गावकी-भावकीचे राजकारण झाले आहे. महापालिका शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देऊ शकत नाही. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिकेत केवळ टक्केवारीचे राजकारण चालते. टक्केवारीचे राजकारण संपविण्यासाठीच फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी महापालिकेची निवडणूक आम्ही लढविणार आहोत. जनतेला आता झेंडा नको अजेंडा हवा असून असे राजकारण आम्ही करणार आहोत.

दिल्लीतील दंगलीत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तरी, देखील गृहमंत्री अमित शहा त्याच्यावर भाष्य करत नाहीत. चिथावणीखोर वक्तव्य करणा-या  भाजप नेत्यांना संरक्षण दिले जात आहे.  दिल्ली दंगलीमागे अप्रत्यक्षपणे भाजपचा हात असल्याचा आरोप देखील किर्दत यांनी केला. शहरात आम आदमीचे मोठी संघटना तयार होईल, असा विश्वास डॉ. मोरे यांनी व्यक्त केला. 23 मार्चपर्यंत सदस्यता मोहीम राबविण्यात येत आहे.

नगरसेवकांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार करणार

शहरात स्वराज्य मॉडेल समोर ठेवून कामकाज केले जाणार आहे. शहरातील 32 प्रभागातील नागरिकांना विचारुन समस्यांची यादी तयार केली जाईल. ती यादी नगरसेवकाला तारीख टाकून पाठविण्यात येणार आहे. ऑनलाईन देखील टाकण्यात येईल. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. या समस्यांची दर महिन्याला नगरसेवकाला आठवण करुन देण्यात येईल. नगरसेवक छोटे प्रश्न सोडवायला किती दिवस घेतात हे नागरिकांना कळेल. त्यानुसार प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकाचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार असल्याचे, प्रवक्ते कपिल मोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.