AAP : आपची स्वराज्य यात्रा 3 जून रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा 3 जून रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. स्वराज्य यात्रेच्या स्वागतासाठी पक्षाचे पदाधिकारी सज्ज झाले आहे. यानिमित्त शहरात पदयात्रा काढण्यात येणार आहे.
आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा 28 मे ते 6 जून पर्यंत 783 किलोमीटरची यात्रा करत आहे. महाराष्ट्राचे भक्तीस्थळ पंढरपूर ते शक्तीस्थळ किल्ले रायगड येथे यात्रेचा समारोप होणार आहे. 3 व 4 जून रोजी ही यात्रा पिंपरी-चिंचवड शहरातून जाणार आहे. आपचे राष्ट्रीय संघटन सचिव संदीप पाठक आणि महाराष्ट्र राज्य सह-प्रभारी गोपाल इटालिया याच्या मार्गदर्शनाखाली आजच्या स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वराज्य यात्रेचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील गावोगावी जाऊन जनतेच्या समस्या समजुन त्यांना वाचा फोडणे आणि दिल्ली आणि पंजाबच्या जनतेसारखे आम आदमी पार्टीला मतदान केल्यावर पक्ष महाराष्ट्र राज्यात काय बद्दल करू शकतो हे पटवण्यासाठी पक्षाची पुर्ण कार्यकारणी जमिनीवर काम करत आहे. स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आपने महाराष्ट्रामध्ये संघटन विस्ताराची मोहीम हाती घेतली आहे.
3 व 4 जून रोजी स्वराज्य यात्रेमध्ये शहरात पदयात्रा जनसभा रॅली अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने पिंपरी-चिंचवड मधील प्रश्नांची चर्चा जनतेसमोर करण्यात येणार आहे.
महापालिकेतील टक्केवारीचे राजकारण आणि प्रशासकांची मनमानी, महापालिकेची मालमत्ता आणि नाट्यगृह, दवाखाने यासारख्या सेवांचे खाजगीकरण, शहरातील पाणी टंचाई आणि टँकर माफीया, मिळकतधारकांना उपयोगकर्ता शुल्काचा भुर्दंड स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारे प्रशासकीय राज, विस्कळीत वीजपुरवठा, शिक्षणाचे बाजारीकरण, शहरातील नद्या आणि नालेसफाईच्या नावाखाली चाललेला सावळा गोंधळ, पुणे-लोणावळा-रेल्वे मार्गाचे चौपदरीकरणाची मागणी, सोसायटीतील कचऱ्याची समस्या, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची व्यथा आदी प्रश्नांना स्वराज्य यात्रेत वाचा फोडणार असल्याचे शहर प्रवक्ते राज चाकणे यांनी सांगितले.