Pimpri : आषाढातील शेवटचा रविवार, खवय्यांचा मटन चिकनवर ताव

चिकन 150 रुपये किलो तर मटन 480 रुपये किलो

एमपीसी न्यूज – गटारी आमावस्या एका आठवड्यावर आली आहे. आषाढ महिन्यातील आज शेवटचा रविवार असल्याने सकाळ पासून शहरातील चिकन – मटनच्या दुकानात रांगा लागल्या होत्या. श्रावण सुरु होत असल्याने त्यापूर्वी नॉनव्हेज पदार्थ खाण्यासाठी खवय्याची चढाओढ लागली आहे. आठ दिवसापासून काही जण चिकन, मटनावर ताव मारत आहे. गटारी अमावास्या काही दिवसांवर आल्याने अंडी, मासे, तसेच चिकन-मटनाला मागणी वाढली आहे.

चिकन व मटनाच्या विविध प्रकारच्या डिशेसना प्रचंड मागणी आहे. नॉन व्हेज हॉटेल्स मध्ये देखील शनिवार रविवार प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी एक आठवडा आधीच चिकन व मटनाला मागणी वाढते. नेहमीपेक्षा दुप्पट कोंबड्या व बोकडांची जमवाजमव केली आहे. यंदा गावरान कोंबड्या कमी असल्याने बॉयलरला मागणी आहे. पाटर्य़ांमुळे कोंबड्यांच्या विक्रीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. चिकनच्या खपात 20, तर अंड्यांच्या विक्रीत 25 टक्के वाढ झाल्याचे विक्रेते अख्तर शेख यांनी सांगितले.

मागील दोन वर्षे दुष्काळ असल्यामुळे यंदा चिकन महाग झाले आहे. मार्केटमध्ये मालच नसल्याने व्यापार्‍यांना दर वाढवावे लागले आहेत. शहरात रविवारी सुमारे दोन ते अडीच टन चिकन, मटनाची विक्री होते. गटारीला हॉटेल व ढाबे चालकांकडून दुप्पट मागणी असल्यामुळे ही विक्री साडेपाच टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. चिकन सध्या 150 रुपये किलो आहे. मार्केटमध्ये सध्या गावरान कोंबडी मिळणे अवघड झाले आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. शहरात दररोज सुमारे एक टन मटनाची विक्री होते. गटारी अमावास्येला शहरातील अनेक हॉटेलचालकांकडून मटनाला दुप्पट मागणी असते.

सध्या 480 रुपये किलो दराने मटन मिळते. ‘गटारी’च्या पार्श्वभूमीवर हॉटेल व ढाबेचालकांनी ऑर्डर देऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे यंदा जवळपास अडीच टनांपर्यंत मटनाची विक्री होईल, असा अंदाज आहे. पावसाळा असल्यामुळे सध्या माशांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचे दर किलोमागे 20-30 रुपयांनी वाढले आहेत. यंदा ‘गटारी’ला शहरात सुमारे साडेपाच टन चिकन व मटनाची विक्री होईल, असा अंदाज व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला. तशा ऑर्डर व्यापार्‍यांनी घेतल्या आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.