Thergaon News : थेरगावात मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण; सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज : पोलिस असल्याचे सांगून मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण करून सहा लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना वाकड पोलिसांनी अटक केली. तसेच, व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. ही घटना डांगे चौक, थेरगाव येथे मंगळवारी (ता. 15) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी अशोक बेलिराम आगरवाल (वय 53, रा. विकास नगर, किवळे) यांनी फिर्याद दिली. सिद्धार्थ भारत गायकवाड (वय 32), प्रीतेश बबनराव लांडगे (वय 30), राहुल छगन लोंढे (वय 24), प्रकाश मधुकर सजगणे (वय 31), कमलेश बाफना, संतोष ओव्हाळ व आकाश हारकरे (रा. सर्वजण वाकड) यांच्यावर अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल झाला.

या बाबत माहिती अशी की, मंगळवारी दुपारी काही अनोळखी व्यक्ती आगरवाल यांच्या मेडिकलमध्ये घुसले. त्यांनी कपाटातील एमटीपी कीट व दोन फायली घेतल्या. तसेच, ‘आम्ही पोलिस असून, या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास 302 चा गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्वांना येरवडा जेलची हवा खावी लागेल, अशी भीती दाखवीत जबरदस्तीने आगरवाल यांना त्यांच्या मोटारीत बसविले. दत्त मंदिर वाकड रस्त्यावर फिरवून आगरवाल व डॉ. खरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली व एक तासाच्या आत पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली.

या प्रकाराबाबत डॉ. खरे यांनी वाकड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना फोन लावून विचारपूस केली. त्यावेळी ते म्हणाले की, ‘आमचे असे कोणीही पोलिस आले नाहीत. त्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक अशोक जगताप व विजय वेळापुरे यांना घटनास्थळी पाठविले. या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता डांगे चौक गाठले असता आरोपी त्यांना बघून पळू लागले. मात्र, त्यांनी पाठलाग करून पाच जणांना पकडत मोटारीत बसविलेल्या व्यावसायिकाची सुटका केली. दोन आरोपी फरारी झाले होते. त्यापैकी एकाला रात्री अटक केली. दरम्यान, या गुन्ह्यातील सिद्धार्थ गायकवाड व संतोष ओव्हाळ हे टायगर ग्रुप संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी याआधी असे प्रकार कुठे-कुठे केले? याचा तपास पोलिस करीत आहेत.

गोळ्यांच्या विक्रीस बंदी

एमटीपी म्हणजे गर्भपाताच्या गोळ्या आहेत. ज्या डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय देता येत नाहीत. सरकारने या गोळ्यांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. याचा फायदा घेत काही मेडिकल दुकानदार जादा पैसे कमविण्याच्या उद्देशाने अवैध गर्भपातासाठी या गोळ्या चढ्या किमतीने विकतात. याचाच गैरफायदा घेत आरोपींनी खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.