Pimpri News : राज ठाकरे यांनी अयोध्येत यावे, असे प्रभू रामचंद्र यांनाच वाटत नाही – अबु आझमी

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे माझे काय होणार, या चिंतेने त्रस्त आहेत. मराठीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही मराठी माणसे पाठीशी उभी रहात नसल्याने आता त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. वेळोवेळी भूमिका बदलत असल्याने त्यांचे राजकारण संपले आहे. राज यांनी द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे त्यांची आज बिकट अवस्था झाली आहे. उत्तर भारतीयांना त्यांनी त्रास दिला. त्यांचा अपमान केला. त्यांच्याबद्दल द्वेष पसरविला, त्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये राज यांच्याबद्दल द्वेष आहे. या द्वेषाला घाबरूनच त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. राज यांनी अयोध्येत यावे असे प्रभू रामचंद्र यांनाच वाटत नाही असा सणसणीत टोला समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबु आझमी यांनी राज यांना लगावला तसेच नवीन राज्यघटना तयार करण्याचे मनसुबे केंद्र सरकार रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

समाजवादी पक्षाची पत्रकार परिषद आज (रविवारी) पिंपरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफीक कुरेशी, उपाध्यक्ष बी.डी.यादव यावेळी उपस्थित होते. आमदार आझमी पुढे म्हणाले की, उत्तर भारतीय नागरिक आपल्या सन्मानासाठी काहीही करू शकतात. त्यामुळे राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने बोलत ते नौटंकी करतात, राज ठाकरे कधी म्हणतात की उत्तर प्रदेशचा कोणताही विकास झालेला नाही. कधी म्हणतात की विकास पाहायचा असेल तर उत्तर प्रदेशात जायला हवे. कधी मोदींसोबत गुजरात दौरा करतात. तर, कधी त्यांच्यावर टीका करतात. वेळोवेळी भूमिका बदलून ते नाटके करत आहे.

देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. हिंदू – मुस्लीम अशी धार्मिक विभागणी करुन मतांचे धु्रवीकरण केले जात आहे. पद्धतशीरपणे द्वेषाचे राजकारण खेळले जात आहे. भोंगे, हनुमान चालीसा, मंदिर – मशीद असा वाद उकरुन महागाई, भ्रष्टाचार, देशाची सुरक्षितता या मुद्दयांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यात येत असल्याचा आरोपही आझमी यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.