Vadgaon Maval News : प्रशासकीय काळात अधिकारांचा गैरवापर

ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी केली जावी : राजेश खांडभोर

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीवर मागील आठ महिने प्रशासक नेमले होते, सरपंचाचे सर्व अधिकार प्रशासकाला आले होते. या कार्यकाळात अधिकाराचा गैरवापर झाल्याचे व मोठ्या प्रमाणात  अनियमितता आणि मनमानी कारभार झाल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे या कार्यकाळातील ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी केली जावी अशी मागणी तालुका शिवसेना प्रमुख राजेश खांडभोर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन मावळ पंचायत समितीचे गटविकासाधिकारी सुधीर भागवत यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. परंतु ऑगस्ट 2020 रोजी 57 ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपल्याने नवीन सरपंच, उपसरपंच व सदस्य निवड होईपर्यंत ग्रामपंचायतीवर पंचायत समितीतील वरीष्ठ प्रशासकीय अधिका-यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सरपंचाचे सर्व अधिकार प्रशासकाला आले होते.

आठ महिन्याच्या कालावधीत काही ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार झाल्याचे आढळून आले आहे. या कालावधीत मुदत संपल्याने सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना अधिकार नसल्याने मासीक सभा घेणे शक्य झाले नाही. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे खांडभोर यांनी म्हटले आहे.

तसेच नुकत्याच निवडणूका झाल्याने सर्व नवीन ग्रामपंचायत सदस्य यांना सदरच्या ग्रामपंचायतीचे लाखांचे कर्ज व देणे  दाखविण्यात आले आहे. त्यामुळे मागील आणि आताच्या नूतन सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपामुळे एकमेकांच्या द्वेषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासकीय काळातील ग्रामपंचायतीच्या दप्तर तपासणी आपण स्वतः करून त्याचा अहवाल ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर लावण्यात यावा, तसेच तोपर्यंत संबंधित ग्रामसेवकाची बदली करू नये अशी मागणीही खांडभोर यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.