Pune News : शहरातील बोगद्यांच्या कामाला येणार वेग : महापौर मोहोळ

कामाला चालना देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा

एमपीसी न्यूज : शहरातील पाषण ते कोथरूड वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि सेनापती बापट रस्त्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या पंचवटी, पाषाण ते कोथरूड आणि पंचवटी, पाषाण ते गोखले नगर या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती येणार असून या संदर्भात पालकमंत्री अजित पवार आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात  सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

बोगद्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि कामाला गती देण्याच्या उद्देशाने पालकमंत्री पवार आणि महापौर मोहोळ यांच्यात बैठक पार पडली. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, कोथरूड ते पाषाण हे सध्याचे अंतर चांदणी चौकमार्गे साडे आठ किलोमीटर तर सेनापती बापट रोडमार्गे हेच अंतर साडेनऊ किलोमीटर इतके आहे. बोगदा पूर्ण झाल्यावर हेच अंतर चार किलोमीटर इतके होणार आहे. तर पाषाण रोड ते गोखलेनगर हे अंतर सव्वा चार किलोमीटर असून बोगदा झाल्यावर हेच अंतर 2.900 किलोमीटर होणार आहे. कोथरूड ते पंचवटी या बोगद्याची लांबी 1 हजार 090 मीटर तर पंचवटी ते गोखलेनगर या बोगद्याची लांबी 580 मीटर इतकी आहे. या भागातील वाहतुकीमुळे होणारी कोंडी या बोगद्यांच्या कामानंतर निश्चितच कमी होणार आहे.

‘या कामासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. मात्र वेळेत काम पूर्ण न केल्याने सल्लागार बदलण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सल्लागार बदलाच्या प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला असून चर्चा करून सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या दोन्ही बोगद्यांच्या कामाच्या शासकीय परवानग्या तातडीने मिळणार आहेत’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.