Accident News : भोसरी, आळंदी, चाकण, देहूरोड येथे चार वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील वाहनांनी धडक दिल्याने झालेल्या वेगवेगळ्या चार अपघातांमध्ये चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत बुधवारी (दि. 20) चाकण, आळंदी, भोसरी आणि देहूरोड येथे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

चाकण येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रवींद्र संजय चोपडे (वय 30, रा. केळगाव, हनुमानवाडी, आळंदी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मयत चोपडे त्यांच्या दुचाकीवरून आळंदीकडून चाकणकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन चोपडे यांचा मृत्यू झाला.

याबाबत त्यांचा मोठा भाऊ लहू संजय चोपडे (वय 31) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आळंदी येथे स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भरत देवकाते (रा. हनुमानवाडी, केळगाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. देवकाते त्यांच्या दुचाकीवरून आळंदी चाकण रोडने जात होते. केळगाव जवळ त्यांच्या दुचाकीला एका स्कॉर्पिओ कारने (एम एच 14 / बी के 7214) जोरात धडक दिली. त्यातच देवकाते यांचा मृत्यू झाला. स्कॉर्पिओ चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला.

याबाबत देवकाते यांचा भाऊ महेश विष्णू देवकाते (वय 32) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळ येथे एका पीएमपीएमएल बसने पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात पीएमपीएमएल बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील बबन काकडे (वय 49, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या बस चालकाचे नाव आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावर किवळे येथील मुकाई चौकात एका ट्रकने 69 वर्षीय वृद्धाला उडवले. त्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. नागू मधुकर तरस (वय 69, रा. किवळे, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) सकाळी नऊ वाजता घडली.

ट्रक चालक तानाजी पांडुरंग कदम (वय 55, रा. खोपोली, ता. खालापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मनोहर धोंडिबा तरस (वय 45) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.