Pimpri : पत्रकार निशा पाटील-पिसे यांचे अकाली निधन चटका लावणारे – महापौर

पिंपरी महापालिकेत शोकसभेत श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील धडाडीच्या पत्रकार निशा पाटील-पिसे यांचे अकाली निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. कोणीही टोकाचा निर्णय घेऊ नये. प्रत्येक समस्येवर उपाय असतो. व्यावसायिक स्पर्धा, ताणताणव, हेवेदावे, कौटुंबिक कलह या संकटांवर मात केली पाहिजे. पत्रकार निशा यांच्या स्मृती जतन केल्या जातील. त्यासाठी महापालिकेतर्फे उपक्रम हाती घेण्यात येईल, अशा भावना महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केल्या.  

पत्रकार निशा पाटील-पिसे यांनी 31 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री कौटुंबिक कारणातून आत्महत्या केली. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघातर्फे आज (शनिवारी) शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या या सभेला पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक नामदेव ढाके, अंबरनाथ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मोहन गायकवाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे, उपाध्यक्ष अनिल कातळे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, माधव सहस्त्रबुद्धे, नंदकुमार सातुर्डेकर, बाळासाहेब ढसाळ, विनोद पवार, विश्वास मोरे, सुहास भाकरे यांच्यासह शहरातील सर्व पत्रकार बांधव-भगिनी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, जीवनात अनेक वेळा अडचणी येतात. प्रश्नांचे डोंगर उभे राहतात; मात्र या सर्वांवर मात करता येऊ शकते. यासाठी एकमेकांशी बोला, संवाद साधा यातूनच तणाव कमी होतील. निशाचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे आहे. फक्त बातमीदारी करणे असा तिचा पिंड नव्हता. बातमी मागची बातमी शोधण्याची तिच्याकडे वेगळी कला होती. अनेकांना तिने आपल्या सहृदय स्वभावाने जोडले होते.

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, निशा ही मनमिळावू, कष्टाळू, नेहमी हसतमुख होती. बातमी लिहिण्याची त्यांची वेगळी शैली आणि हातोटी होती. पत्रकारीतेतील सर्व क्षेत्रांची तीने उत्तमपणे बातमीदारी केली. तिचा व्यासंग मोठा होता. तिच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वच क्षेत्रात मोठा मित्र परिवार होता. तिच्या अकाली निधनाने मन सुन्न झाले आहे.

यावेळी खाडे, पवार, मडिगेरी, कलाटे, चिखले, भापकर, गायकवाड,  लांडगे, कातळे,  चिलेकर,  सहस्त्रबुद्धे, सातुर्डेकर, ढसाळ, अबीद शेख, सुहास भाकरे, गुलामअली भालदार, दत्ता कांबळे, अमृता ओंबळे, मनीषा पिसाळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.