BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : कारागृहातून पळून गेलेल्या आरोपीला 12 तासात देहूरोड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – खुनाच्या गुन्ह्याची विसापूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी शौचाच्या निमित्ताने बाहेर येऊन कारागृहातून पळाला. त्याला देहूरोड पोलिसांनी 12 तासाच्या आत पुन्हा अटक केली.

अशोक लक्ष्मण भाग्यवंत (वय 23, रा. ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागे, रुपीनगर, तळवडे) असे पळालेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2011 साली देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केल्याप्रकरणी अशोक याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याची अहमदनगर जिल्ह्यातील विसापूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी रवानगी करण्यात आली. शिक्षा भोगत असताना रविवारी (दि. 21) सकाळी नऊच्या सुमारास जेलच्या बाहेर शौचास जाण्याच्या बहाण्याने तो पळून गेला. याबाबत कारागृह प्रशासनाने देहूरोड पोलिसांना माहिती दिली.

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, गायकवाड, कर्मचारी सावंत, सात्रस, उगले, परदेशी, तेलंग, शेजाळ, घारे यांच्या पथकाने अशोक बाबत माहिती काढली. तसेच त्याला तात्काळ ओटास्कीम निगडी येथे सापळा रचून अटकही केली. अशोक याच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील बेळवंडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3