Talegaon News : लघुशंकेच्या बहाण्याने चौकीतून पळून गेलेल्या आरोपीला अटक

मेहुण्याच्या लग्नासाठी पळून गेल्याची आरोपीची कबुली

एमपीसी न्यूज – प्रतिबंधित गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून आरोपीला शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपीने लघुशंकेच्या बहाण्याने चौकीतून बाहेर येऊन पलायन केले.

त्यानंतर पोलिसांनी 24 तासात त्याचा शोध घेऊन त्याला भिवंडी येथून अटक केली. मेहुण्याच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहायचे असल्याने आपण पळून गेलो असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.

करम होशियतअली शेख (वय 29, रा. कामन रोड, भिवंडी, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथून हडपसर येथे एका पिकअपमधून प्रतिबंधित गुटखा आणला जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मंगळवारी (दि. 30) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा सबवे जवळ सापळा लावून पिकअप (एम एच 47 / ए एस 1481) ताब्यात घेतले.

पिकअपची झडती घेत त्यातून 12 लाख 30 हजार 560 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. तसेच रोख रक्कम, मोबाईल फोन आणि पिकअप असा एकूण 20 लाख 54 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल या कारवाई मध्ये पोलिसांनी जप्त केला.

याबाबत शिरगाव चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करून सामाजिक सुरक्षा विभागाने आरोपी करम शेख आणि त्याच्या साथीदाराला शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस चौकीत असताना करम याने लघुशंकेचा बहाणा करून चौकीतून पलायन केले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने पलायन केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

शिरगाव पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत 24 तासात आरोपी करम याला भिवंडी येथून पुन्हा ताब्यात घेतले. करम याच्या मेहुण्याचे लग्न असल्याने तो चौकीतून पळून गेला असल्याची त्याने पोलिसांना कबुली दिली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.