Bhosari : मोक्कातील फरार आरोपी अटक; सहा गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – मोक्कातील फरार आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली. यामुळे भोसरी पोलीस ठाण्यातील चार, सहकार नगर आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून 2 लाख 22 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

लक्कडसिंग शितलसिंग दुधानी (वय 29, रा. भैरवनाथ नगर, कुसगाव, लोणावळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्यात 16 ऑगस्ट रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून आरोपीची ओळख पटवून हडपसर भागात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून दीड महिन्यांपूर्वी मुंबई बेंगलोर हायवे रोडवर लिफ्टच्या बहाण्याने एका कारला थांबवले. चालकाला चाकूचा धाक दाखवून त्यांनी कार चोरून नेली. त्यानंतर त्याच कार मधून कारचा नंबर बदलून शहरात काही ठिकाणी घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे भोसरी पोलीस ठाण्यातील चार, सहकार नगर आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून 2 लाख 22 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.