Pune News : पोलिसाच्या अंगावर गाडी घालून आरोपीचे पलायन

येरवडा पोलिस ठाण्यातील प्रकार

एमपीसी न्यूज : अंदमान कोर्टाचे वॉरंट असलेला एक आरोपी येरवडा पोलीस ठाण्याच्या आवारातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून पळून गेला. 26 जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. गाडीत असणाऱ्या हिटरवर ऊब घेण्याचा बहाणा करून आरोपीने अशाप्रकारे पळ काढल्याने एकच खळबळ माजली आहे.

उत्कर्ष पाटील (रा.नीलांजली सोसायटी, कल्याणी नगर, पुणे)  असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलीस नाईक विनायक उलगा मुधोळकर यांनी तक्रार दिली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे आरोपी उत्कर्ष पाटील यांच्या नावाने वॉरंट आले होते. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याला घेऊन आले होते. पोलीस ठाण्याच्या आत मध्ये वरिष्ठ कर्मचारी आरोपीला घेऊन जाण्यास संबंधित प्रक्रिया पार पाडत होते. आरोपी हा एका हाताने अपंग आहे.

दरम्यान थंडीमुळे हात दुखत असल्यामुळे आपल्या इनोव्हा गाडीमधील हिटरने ऊब घेण्याचा बहाणा करून तो गाडीत शिरला. त्यानंतर त्या ठिकाणी उभे असलेले सहायक पोलिस फौजदार मोरे यांना धक्का देऊन खाली पाडले आणि इनोव्हा गाडी सुरू करून फिर्यादीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून पळून गेला आहे.

याप्रकरणी अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे करीत आहेत.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.