Crime News : मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीकडून पोलिसाला मारहाण

एमपीसी न्यूज – मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या पत्नीसह मिळून पोलिसांसोबत हुज्जत घालून मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.10) रात्री निगडी पोलीस ठाण्याजवळ घडली.

विकास भिसे (वय 25), त्याची पत्नी (वय 19, दोघे रा.आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर जाधव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अमर जाधव आणि पोलीस नाईक एस. एल. मुळे गुरुवारी बिट मार्शलवर कर्तव्यावर होते.रात्री साडेआठच्या सुमारास पांढरकर वस्ती येथे निर्जनस्थळी एक कार संशयितपणे उभी असल्याचे दिसल्याने पोलीस कारजवळ गेले. कारमध्ये आरोपी बसले होते.त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता विकास याने, तू मला ओळखत नाहीस काय. मी विकास भिसे, मी मोक्कामधील आरोपी आहे.चल निघ, गाडीची चौकशी बंद कर; असे पोलिसांना दम देत म्हटले.

विकासवर संशय बळावल्याने पोलिसांनी कारचे दरवाजे उघडून कारची तपासणी सुरु केली असता विकासने पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ केली.पोलीस नाईक मुळे यांना पकडून हाताने ठोसा मारून तो पळून गेला.फिर्यादी यांना त्याने ढकलून दिले.त्यात फिर्यादी यांच्या हाताला दुखापत झाली. आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला.त्यांनतर पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता तिने देखील पोलिसांशी हुज्जत घालून, मी तुम्हाला सोडणार नाही.तुमची नोकरी घालवते का नाही ते बघा, असे म्हणून आरडाओरडा करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.