Dehuroad : पोलीस लॉकअपमध्ये आरोपी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न;

पोलिसांना बघून घेण्याची धमकी

एमपीसी न्यूज – पोलीस लॉकअप मध्ये असलेल्या आरोपी महिलेने पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच स्वतःचे कपडे फाडून त्याद्वारे लॉकअपमध्येच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी झटापटी करत जेलमधून बाहेर आल्यानंतर पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 29) पहाटे साडेचार वाजता देहूरोड पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये घडली.

रेणुका सुहास सुवर्णकार (वय 40, रा. आळंदी रोड, भोसरी) असे लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणा-या आरोपी महिलेचे नाव आहे. याबाबत महिला पोलीस शिपाई दिपाली वासुदेव मुळूक यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेजल दिलीप राठोड (वय 25, रा. आळंदी रोड, भोसरी) यांचे आळंदी रोडवर दुकान आहे. मंगळवारी (दि. 27) दुपारी सेजल यांची आई, वडील, भाऊ, बहिण आणि दुकानातील कामगार दुकानात होते. त्यावेळी आरोपी रेणुका आणि तिचे पाच साथीदार जबरदस्तीने दुकानात आले. त्यांनी दुकानातील ग्राहकांना बाहेर जाण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कामगारांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त टाकून जीवे मारण्याची धमकी दिली.  याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 27) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रेणुका आणि तिच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.

रेणुका हिला देहूरोड येथील महिला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. लॉकअपमध्ये असताना गुरुवारी पहाटे साडेचार वाजता रेणुकाने फिर्यादी महिला पोलीस शिपाई दिपाली मुळूक आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील अंमलदारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

लॉकअपमध्ये असताना रेणुकाने स्वतःच्या अंगावरील कपडे फाडून घेऊन त्याच कपड्याने जाणीवपूर्वक स्वताचा गळा आवळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला अडविण्यासाठी फिर्यादी गेल्या. रेणुकाने पोलिसांशी झटापटी केली. तसेच जेलमधून बाहेर येताच फिर्यादी महिला पोलीस शिपाई मुळूक, नामदेव तलवाडे आणि भोसरी पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांना बघून घेतेच अशी धमकी दिली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.