Wakad News : सशक्त मन, शरीर आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘मॉर्निंग वॉक विथ पोलीस’ उपक्रम – एसीपी श्रीकांत डिसले

एमपीसी न्यूज – सशक्त मन, सशक्त शरीर आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘मॉर्निंग वॉक विथ पोलीस’ हा उपक्रम घेण्यात आला असल्याचे वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले. वाकड येथे राबविण्यात आलेल्या ‘मॉर्निंग वॉक विथ पोलीस’ या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांशी एसीपी डिसले यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, एसीपी डिसले यांनी ‘मॉर्निंग वॉक विथ पोलीस’ उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना व्यायामाचे महत्व, कोणता व्यायाम करावा याबाबत माहिती दिली.

पिंपरी – चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि पोलिसांच्या माध्यमातून ‘मॉर्निंग वॉक विथ पोलीस’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पिंपरी – चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी धोमसे सवाई, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले, ‘सशक्त मन, सशक्त शरीर आणि नागरिकांची सुरक्षितता या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मागील काही दिवसांमध्ये चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग असे गुन्हे घडले आहेत. त्याचे विश्लेषण केल्यानंतर व्हिजिबल पोलिसिंग असणे ही बाब लक्षात आली. या मॉर्निंग वॉकमध्ये केवळ चालणे नाही तर संवादही आहे. नागरिक त्यांच्या अडचणी पोलिसांना सांगू शकतात. यातून जास्तीत जास्त नागरिकांच्या अडचणी सोडविल्या जाणार आहेत.’

तेजस्विनी धोमसे सवाई म्हणाल्या, कोरोना साथीमुळे सर्वजण घरात होतो. आता कोरोनाची साथ कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता सर्व नियम पाळून घराबाहेर यायला हवं. शहरात गुन्हेगारीचा दर वाढला आहे. महिलांची छेड काढणे, मजा म्हणून महिलांना धडक देणे, मोबाईल हिसकावणे, दागिने हिसकावणे असे अनेक प्रकार दररोज समोर येत आहेत. या घटना वारंवार ज्या ठिकाणी घडतात अशी ठिकाणे नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावीत. त्या ठिकाणांवर नागरिकांचा पोलिसांचा वावर वाढल्यास असे प्रकार होणार नाहीत.

केवळ गुन्हेगारीच्याच समस्या भेडसावत नाहीत. तर त्याबरोबर अस्ताव्यस्त पार्किंग आणि अन्य समस्या देखील आहेत. त्यासाठी वाहतूक पोलीस, महापालिका अधिकारी देखील या वॉकमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. त्याबाबत पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्या माध्यमातून पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना विनंती केली जात आहे. त्यामुळे एका वॉक मध्ये बहुतांश समस्या सोडविण्यासाठी मदत होईल, असेही तेजस्विनी धोमसे सवाई यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.