Bhosari : महापालिकेची भोसरीतील अतिक्रमणावर धडक कारवाई; 130 टप-यांवर हातोडा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण विभागाने आज (शुक्रवारी) भोसरीतील अतिक्रमणावर धडक कारवाई केली. 130 टपरी, भाजी मंडई शेड, पत्राशेड कारवाई करण्यात आली. यामुळे राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाने मोकळा श्‍वास घेतला आहे. आजपर्यंतची भोसरीतील ही सर्वात मोठी कारवाई ठरली. दरम्यान, कारवाई दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. 

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाचा परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील परिसर अतिक्रमणांनी अक्षरशः गिळंकृत केला होता. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. रहदारीला अडचण येत होती. वारंवार कारवाईची मागणी करुन देखील पालिकेकडून कारवाई केली जात नव्हती.

अखेर आज (शुक्रवारी) महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धाडस करत धडक कारवाई केली. भोसरी, धावडेवस्ती येथील अनधिकृत टप-यांवर हातोडा चालविला. त्यामध्ये 130 छोट्या-मोठ्या टप-यांवर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक गुन्हे, तीन उपनिरीक्षक 50 पोलीस कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे 30 कर्मचारी 55 बिट निरीक्षक, 10 कनिष्ठ अभियंता, 5 उपअभियंता, 56 बिट निरीक्षक, 12 मनपा पोलीस कर्मचारी, याशिवाय अग्निशामक विभागाची एक गाडी, रुग्णवाहिका तैनात होती.

सात जेसीबी, क्रेन व तीन डम्परच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता एस आर चौरे, खरात संजय, शाखा अभियंता किरण अंदुरे, अभय कुलकर्णी आदींनी कारवाई करण्याकरिता पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.