Pune: वीजपुरवठा सतत खंडित झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई- ऊर्जामंत्री राऊत

Action against officials in case of power outage says power minister nitin raut

एमपीसी न्यूज- वीजग्राहकांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यास संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध कामांचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी (दि. 29) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यावेळी उपस्थित होते.

डॉ. राऊत म्हणाले, कोरोना विषाणूच्या सावटामुळे बंद असलेले व्यवसाय, उद्योग हळूहळू सुरु होत आहेत. यासोबतच शासकीय व खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ देखील सुरु आहे. सध्या उन्हाळा असल्याने अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्याची अत्यंत गरज आहे.

ज्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे त्याची गंभीर दखल घेऊन संबंधीत जबाबदार व अकार्यक्षम कर्मचारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा अशा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला

बारामती परिमंडलामध्ये ‘एक गाव- एक दिवस’ हा वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचा, नवीन वीजजोडणी व वीजबिल दुरूस्ती मोहिमेचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाचे डॉ. राऊत यांनी कौतुक केले.

हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले. वीजग्राहकांना प्रामुख्याने वीजपुरवठ्याबाबतची माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळालीच पाहिजे.

देखभाल व दुरुस्तीसाठी वीज बंद ठेवण्याची पूर्वसूचना असेल किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची ग्राहकांना पूर्वसूचना न मिळाल्यास गंभीर दखल घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी असलेली विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या सदस्यांनी निवडप्रक्रिया सुरु होत आहे. या समितीच्या नियमित बैठकी घेण्यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वीजविषयक स्थानिक प्रश्न सोडविण्यात यावे तसेच थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करावेत.

सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी राज्यभरात कंत्राटदार नेमण्यात आले आहे.

या कंत्राटदारांकडून तत्परतेने किंवा आवश्यकतेनुसार समाधानकारक कामे होत नसल्यास किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे खंडित वीजपुरवठ्याचा कालावधी वाढत असल्यास अशा कंत्राटदारांविरुद्ध ताबडतोब कारवाई करण्यात यावी आणि त्यांचा काळ्या यादीत समावेश करावा, अशी सूचना यावेळी डॉ. राऊत यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.