Pimpri : वाहतुकीचे नियम मोडणा-या सव्वाचार हजार वाहनांवर कारवाई

पिंपरी पोलिसांची विशेष मोहीम

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनांवर कायदेशीर कारवाई सत्र 17 ऑगस्ट रोजी सुरू केले होते. यामध्ये पोलिसांनी 24 दिवसात तब्बल 4 हजार 302 वाहनांवर कारवाई केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नो पार्किंग, रॉग साईड, नो एण्ट्री, ट्रिपल सीट, सिग्नल कटिंग असे वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली. मागील 24 दिवसात पिंपरी पोलीस ठाणेच्या हद्दीत आंबेडकर चौक, महावीर चौक, रसरंग चौक, खंडोबा माळ चौक, शिवाजी चौक, शगुन चौक, साई चौक, मोहननगर, भाटनगर, नेहरूनगर या प्रमुख चौकांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 4 हजार 302 वाहनांवर कारवाई करण्यात आली.

पिंपरी पोलिसांनी कारवाई केलेल्या वाहनांची माहिती पिंपरी वाहतूक विभागाकडे दिली आहे. ही कारवाई ही पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलिस उपायुक्त पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे आणि त्यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.