Pune : अतिवृष्टी बाधित भागासाठी लवकरच कृती आराखडा – महापौर

एमपीसी न्यूज – शहराच्या काही भागात २५ सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागासाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात, यासाठी लवकरच कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह पदाधिकारी, खाते प्रमुख आणि स्थानिक नगरसेवक यांच्या उपस्थितीत बाधित भागाची दि. २३ डिसेंबरला पाहणी होणार आहे. त्यानंतर तातडीने कृती आराखडा तयार करून ठोस उपाययोजनासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने पावले उचलली जाणार आहेत. यासाठी महापौर मोहोळ यांनी स्वतः पुढाकार घेऊन पाहणी संदर्भातील सूचना आयुक्तांकडे केली होती.

‘बाधित भागाचा आढावा, पाणी साचण्याची कारणे, घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना आणि बधितांना न्याय मिळवून देण्याचा दृष्टीने या पाहणीचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय केवळ पाहणीपुरते मर्यादित न राहता कृती आराखडा आम्ही तयार करत आहोत, जेणे करून या भागाला योग्य न्याय मिळून, अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही’ असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.