Chinchwad News : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस ठाण्यातील एका मद्यपी पोलिसावर आणि दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एकावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाचे एका पोलीस अधिकारी महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांच्यात कुरबुरी होऊन खटके उडाले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस ठाण्यातच भांडण करत शिपायाने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो शिपाई जखमी झाला. त्याने अधिकारी महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घडलेल्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास 18 दिवसांचा कालावधी लागला. हा विलंब का लागला, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आत्महत्येचा प्रयत्न करणा-या पोलिसाला निलंबित केले.

चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचा-याने मद्य प्राशन करून पोलीस व्हॅन चालवली. हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.