Bhosari News: वृक्षतोडीला परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई करणार : आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी एमआयडीसीतील प्लॉट नंबर 37 येथे लावलेल्या 292 झाडे तोडण्यास परवानगी देताना प्रक्रियेचे पालन केले आहे की नाही याची तपासणी केली जाईल. परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

एमआयडीसीने भोसरीतील प्लॉट नंबर 37 वृक्षारोपणासाठी महापालिकेकडे हस्तांतरित केला होता. पाच एकरचा हा भूखंड आहे. या जागेवर महापालिकेने 1997 सालापासून वृक्षारोपण केले होते. अर्जुन, निलगिरी, बाभुळ, पिंपळ, कडुनिम, पिंपर्णी, आपटा, फुलवंती, बकुळ, पेल्टा, भेंडी अशा 292  झाडांची लागवड केली होती. ही झाडे मोठी झाली आहेत.

एमआयडीसीने प्लॉटची विक्री केल्याने महापालिकेने 23 वर्षांपूर्वीची झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

झाडे तोडण्यासाठी परवानगी देताना नियमांचे कोणतेही पालन केले नाही. झाडांवर नोटिसा लावल्या नाहीत. वृत्तपत्रात नोटीस दिली नाही. महापालिका संकेतस्थळावर देखील माहिती दिली नाही. हरकती मागविल्या नाहीत, असा आरोप वृक्षप्रेमींनी केला होता.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”वृक्ष प्राधिकरण समितीने झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. समितीने प्रक्रियेचे पालन केले आहे की नाही याची तपासणी केली जाईल. नियमाचे उल्लंघन झाले असल्यास  संबंधितांवर उचित कारवाई करण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.