chikhali News : चिखली – कुदळवाडीतील सिग्नल तातडीने कार्यान्वित करा – दिनेश यादव

एमपीसीन्यूज : चिखली – कुदळवाडी परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या भागातील सर्व सिग्नल त्वरित कार्यान्वित करण्याची मागणी फ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चिखली, कुदळवाडी परिसरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी महापालिकेच्यावतीने रस्त्यांची कामे सुरु आहे. स्मार्ट सिटीची कामेही सुरु आहेत. चिखली परिसरातून चाकण एमआयडीसी व तळवडे एमआयडीसी येथे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे.

कामगारांच्या बसेस, पीएमपी बसेस तसेच ट्रक व अन्य खासगी वाहनांची मोठी वर्दळ या भागात दिवसभर सुरु असते. सकाळी आणि संध्याकाळी चिखली गाव आणि कुदळवाडी भागात वाहतूक कोंडीची बाब नित्याची झाली आहे. त्याचा स्थानिक ग्रामस्थांसह वाहन चालकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

यात बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्यातून अपघात आणि वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत.

वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी चिखली आणि कुदळवाडी परिसरात सिग्नल बसविण्यात आले आहेत. मात्र, ते अद्याप सुरु नसल्याने त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे हे सिग्नल तातडीने कार्यान्वीत केल्यास या भागातील वाहतुकीला शिस्त लागण्यासह वाहतूक कोंडीची समस्याही दूर होण्यास मदत होईल,  असे दिनेश यादव यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत त्यांनी चिखली -तळवडे वाहतूक विभाग व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना लेखी निवेदन दिले. त्यात चिखली परिसरातील सर्व सिग्नल त्वरित कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.