Actor Abhijeet Kelkar Covid positive: अभिनेता अभिजीत केळकर कोरोना पॉझिटिव्ह

माझ्यात कोणतीही कोरोनाची लक्षणं नव्हती. मात्र चाचणी केल्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असं म्हणत अभिजीतने ही माहिती दिली.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या आजाराची आपण आणखी गंभीरपणे दखल घ्यायला हवी हेच समोर येत असलेल्या अनेक गोष्टींमधून अधोरेखित होत आहे. या विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. कालच अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. तशी माहिती सुबोधने दिली होती. तो आणि त्याचे कुटुंबीय योग्य ती काळजी घेत आहेत.

मात्र आता त्याच्यानंतर बिग बॉस मराठी 2 फेम अभिनेता अभिजीत केळकर यालादेखील कोरोनाची लागण झाली आहे. अभिजीतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. माझ्यात कोणतीही कोरोनाची लक्षणं नव्हती. मात्र चाचणी केल्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असं म्हणत अभिजीतने ही माहिती दिली.

“नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली… माझी फक्त पाठ दुखत होती. या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हते.

डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली… त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे… माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत… तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत धन्यवाद…”,अशी पोस्ट अभिजीतने शेअर केली आहे.

अभिजीत सध्या सोनी मराठीवर प्रसारित होणा-या सिंगींग स्टार या रिअ‍ॅलिटी शोमधील एक स्पर्धक आहे. आता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर या स्पर्धेमधील त्याचे स्थान काय राहिल अशी रसिकांना उत्सुकता लागली आहे. अभिजीतने या स्पर्धेत आपल्या गायनाची चुणूक दाखवली असून गायिका कविता राम ही त्याची या कार्यक्रमात गुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.